चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णयाचा निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णयाचा निषेध करत शासनाने दिलेला महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार राज्यभरातील पुरस्कार प्राप्त विजेते सरकारला परत करतील. २६ जून रोजी राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनी पुरस्कार वापसी केली जाईल.
पुरोगामी महाराष्ट्रात प्रतिगामी निर्णय, दारूबंदी, व्यसनमुक्तीसाठी आम्ही निर्भय असे राज्यव्यापी अभियान १७ जून राजमाता जिजाऊ स्मृती दिवस ते २६ जून राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिवस यादरम्यान राबविले जाणार असल्याचे व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाचे राज्य निमंत्रक अविनाश पाटील व नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी सांगितले. याअंतर्गत व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंच पुढाकाराने राबविल्या जाणाऱ्या राज्यव्यापी अभियानादरम्यान राज्यभरातील शंभरपेक्षा जास्त संघटना, संस्था, गटांमार्फत कृती कार्यक्रम राबविला जाईल.
यादरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही महाराष्ट्र सरकारचा चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याच्या निर्णयाचा निषेध विविधांगी पद्धतीने केला जाईल. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी मागे घेतल्याचा निषेध व हा निर्णय त्वरित रद्द करण्याच्या मागणीची निवेदने शिष्टमंडळासह दिली जातील. या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी आणि राज्य सरकारने स्वीकारलेले व्यसनमुक्ती धोरण २०११ राबविण्यातील नाकर्तेपणा विरोधात महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
..............................................