मुंबई- सत्य आणि अहिंसा या मूल्यांवर आधारित स्वातंत्र्यलढा उभारून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त जगविख्यात कला महाविद्यालय अशी ओळख असणारे मुंबईतील सर जे जे कला महाविद्यालय त्यांना अनोखी कलामय आदरांजली वाहणार आहेत. मुंबईसह पुणे, नाशिक, कोल्हापूर असे महाराष्ट्रभरातील तब्बल १५० कलावंत या अनोख्या आदरांजलीच्या सोहळ्यात सहभागी होणार असल्याची माहिती सर जे. जे. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे यांनी दिली.
दोन ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सर जे. जे. कला महाविद्यालयाचे दरवाजे सर्वसामान्य कलाप्रेमी जनतेसाठी खुले असणार आहेत. याविषयी अधिक माहिती देताना सर ज. जी. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे म्हणाले, “जगभरात उसळलेल्या हिंसेवर शांततेच्या मार्गानेच मात करणे आवश्यक आहे. त्यासाठी आजही महात्मा गांधीजींचे विचार पथदर्शक आहेत. म्हणूनच ‘शांततेसाठी कला’ या ब्रीदवाक्यासह आम्ही हा उपक्रम आयोजित केला आहे.”
“जे. जे. कला महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमात मुंबईसह देशभरातील असे एकूण १५० कलावंत सहभागी होणार आहेत. त्यामध्ये चित्रकार, शिल्पकार आणि वस्त्रकलाकार आपापल्या कलांद्वारे गांधीजींना आदरांजली वाहणार असून, त्यांची चित्रकला, शिल्पकला आणि वस्त्रकला कलारसिक-प्रेमींना ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवता येणार आहे, असंही प्रा. विश्वनाथ साबळे यांनी सांगितले.