मुंबई : महात्मा गांधी स्पोटर््स अकादमी संघाने संघर्ष क्रीडा मंडळ संघावर १६-१० (१६-६, ०-४) अशी १ डाव व ६ गुणांनी मात करत ३० व्या मुंबई महापौर खो-खो स्पर्धेत विजयी सलामी दिली. दुसऱ्या बाजूला विद्यार्थी क्रीडा केंद्राने स्वराज स्पोटर््स क्लबला १५-६ (१५-३, ०-३) असे नमवत स्पर्धेला विजयी सुरुवात केली.मुंबई उपनगर खो-खो संघटना आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भांडुप येथील कोकण नगर मैदानात मॅटवर सुरू असलेल्या या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना महात्मा गांधी आणि संघर्ष मंडळ यांच्यात पार पडला. बलाढ्य महात्मा गांधी संघाने अपेक्षेप्रमाणे सहज विजय मिळवला. आंतरराष्ट्रीय खेळाडू अनिकेत पोटेने आक्रमणात ३ गडी आणि संरक्षणात २ मिनिटांची धाव असे अष्टपैलू प्रदर्शन केले. पहिल्या डावात तब्बल १० गुणांची मजबूत आघाडी घेऊन महात्मा गांधी संघाने विजयाचे इरादे स्पष्ट केले. संघर्षच्या जयेश दवडेने आक्रमणात ३ गडी बाद केले. मात्र सांघिक खेळाचा अभाव आणि कमजोर संरक्षण यामुळे संघर्ष मंडळाला पराभव स्वीकारावा लागला.विद्यार्थ क्रीडा केंद्र विरुद्ध स्वराज स्पोटर््स क्लब यांच्यात झालेल्या सामन्यात विद्यार्थी संघाने १५-६ असा १ डाव व ९ गुणांनी पराभव केला. विद्यार्थी संघाच्या सुजय मोरेने दोन्ही डावांत अनुक्रमे नाबाद २.४० व ४.३० मिनिटे संरक्षण केले. आयुष गुरवने आक्रमणात ४ गडी बाद केले आणि या जोरावर विद्यार्थी संघाने सोप्या विजयाची नोंद केली. तर स्वराजच्या राजेश बाटलेने पहिल्या डावात १.३० मिनिटे संरक्षण करत एकाकी झुंज दिली. (क्रीडा प्रतिनिधी)
महात्मा गांधी संघाची विजयी सलामी
By admin | Published: April 21, 2017 12:56 AM