मुंबई : गोरगरीब रुग्णांना वरदान ठरलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आता राज्यातील सर्व नागरिकांना लागू करण्यात आली आहे. तसेच या योजनेच्या उपचाराचे कवच पाच लाख रुपयांपर्यंत करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने त्यासंबंधीचा मोठा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. या योजनेत राज्यातील १००० रुग्णालयांचा सहभाग असून, आजाराची संख्या ९९६ वरून १३५६ इतकी करण्यात आली आहे.
२०१२ साली सुरू झालेल्या या योजनेत आतापर्यंत गरीब रुग्णांना दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळत आहेत. योजनेत सध्या ९९६ आजारांचा समावेश असून, राज्यातील शासकीय आणि बिगर शासकीय मिळून एक हजार रुग्णालयांत ही योजना राबविली जात आहे. राज्यात सध्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना कार्यान्वित आहेत. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत ५ लाखांचे आरोग्य विम्याचे कवच मिळते. मात्र, या योजनेचे कार्ड असलेले नागरिक किंवा त्यांचे नाव यापूर्वीच योजनेसाठी नोंदविण्यात आले आहे, त्यांनाच लाभ मिळतो. या योजनेसाठी नव्याने नोंदणी करता येत नाही.गेल्या काही महिन्यांपासून महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुषमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना एकत्रित करून विस्तारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
कोण असणार लाभार्थी ?
गट - अ पिवळे, केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंब गट - ब शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंब ( शासकीय/ निमशासकीय कर्मचारी यासह ) व कोणत्याही प्रकारची शिधापत्रिकाधारक नसलेले कुटुंब. यामध्ये राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश होईल. गट - क गट - अ आणि गट - बमध्ये समाविष्ट न होणारे पुढील घटक शासकीय / शासनमान्य आश्रम शाळेतील विद्यार्थी, मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक, तसेच माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांतील सदस्य, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी जीवित महाराष्ट्र राज्याबाहेरील रहिवासी असलेले बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंब. गट - ड लाभार्थींच्या ‘अ’ ‘ ब’ ‘ क ‘ या गटामध्ये समाविष्ट न होणारे महाराष्ट्र सीमा भागातील रस्ते अपघातात जखमी झालेले महाराष्ट्राबाहेरील व देशाबाहेरील रुग्ण. आता ही योजना राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंब व अधिवास प्रमाणपत्रधारक (डोमिसाईल सर्टिफिकेट) कुटुंबाना लागू करण्यात येत आहे.
मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी साडेचार लाख रुपये
सध्या मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये उपचार खर्च मर्यादा प्रति रुग्ण अडीच लाख एवढी होती. ती आता साडेचार लाख एवढी करण्यात आली आहे.