मुंबई - भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर नाट्यमय घडामोडी घडून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्र आले होते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले हे मविआ सरकार अवघ्या अडीच वर्षांत कोसळले होते. तेव्हापासून महाविकास आघाडीमधील घटकपक्षांमध्ये धुसफूस दिसत आहे. दरम्यान, नाना पटोले यांनी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मैत्रिबाबत धक्कादायक विधान केले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील संबंध बिघडण्याची शक्यता आहे.
नाना पटोले काँग्रेस आणि शिवसेनेमधील मैत्री आणि संभाव्य आघाडीबाबत म्हणाले की, शिवसेना हा काही आमचा काही रेग्युलर पार्टनर नाही. भाजपा आणि शिवसेनेची झालेली भांडणं आणि पहाटेचं बनलेलं सरकार हे सर्वांना माहिती आहे. म्हणून शिवसेना हा काही आमचा नैसर्गिक मित्र नाही. आमच्या विचारसणीसोबत असतील तर ते आमचे मित्र. पण आता आपण पाहतोय की नुकत्याच झालेल्या क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र होते. आम्हाला अजूनही त्या गोष्टीचा संभ्रम आहे. भाजपा ही देशाला बरबाद करणारी व्यवस्था आहे. त्यामुळे भाजपासोबत कुठलेही संबंध नसतील ते आमचे मित्र, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
नुकत्याच झालेल्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत भाजपाचे आशिष शेलार, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर एकत्र आले होते, त्यावरून नाना पटोले यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली होती.दरम्यान, नाना पटोले यांनी केलेल्या या विधानाबाबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून कुठलीही प्रतिक्रिया उमटलेली नाही. मात्र पटोलेंनी केलेल्या विधानामुळे महाविकास आघाडीमध्ये काही आलबेल नसल्याचे चित्र निर्माण होत आहे.