योग्य स्थान मिळाल्यास गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:05 AM2021-09-13T04:05:34+5:302021-09-13T04:05:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गोव्यात शिवसेनेच्या स्थानिक युनिटने पाच वर्षांपासून काम सुरू केले आहे. गोवा विधानसभेच्या २०-२१ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोव्यात शिवसेनेच्या स्थानिक युनिटने पाच वर्षांपासून काम सुरू केले आहे. गोवा विधानसभेच्या २०-२१ जागा आम्ही लढविणार आहोत. गोव्यातील आघाडीत योग्य स्थान मिळाल्यास तिथेही महाविकास आघाडीचा प्रयोग करू शकतो, असे विधान शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी केले.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना गोव्यात २०-२१ आणि उत्तर प्रदेशात ८० ते १०० जागा लढविणार असल्याचे स्पष्ट केले. गोव्यात महाविकास आघाडीसारखा प्रयोग करू शकतो. गोव्याच्या आघाडीत योग्य स्थान मिळाले तर आम्ही आघाडीत जाऊ शकतो. तर उत्तर प्रदेशात ८० ते १०० जागा लढविणार आहोत. उत्तर प्रदेशातही काही शेतकरी संघटना आहेत. या संघटना आमच्या सोबत यायला तयार आहेत. विशेषतः पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी संघटनांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातही आघाडीचा प्रयोग होऊ शकतो, असे राऊत म्हणाले. मात्र, गोवा आणि उत्तर प्रदेशात आघाडी झाली नाही तर आम्ही एकटे लढू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गुजरातमध्ये भाजपने मुख्यमंत्री बदलला. याबाबत संजय राऊत म्हणाले की, हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. उत्तराखंड आणि कर्नाटकमध्येही मुख्यमंत्री बदलण्यात आले आहेत. यापूर्वी काँग्रेसनेही आपले मुख्यमंत्री बदलले. हा त्या त्या पक्षाचा अंतर्गत संरचनेचा भाग आहे. त्यावर इतरांनी बोलू नये. पण, गुजरातमध्ये भाजपची स्थिती बरी नाही. पाच वर्षांपूर्वी भाजपला काठावरचे बहुमत मिळाले होते, असे राऊत म्हणाले.
हवेत गोळीबार करू नये
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कानाखाली मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही, असे ठाकरे सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याने आपल्याला सांगितल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यावर हा एक मंत्री कोण, असा प्रश्न विचारत राऊत म्हणाले की, असा हवेत गोळीबार करून चालणार नाही. कोणी कोणाच्या थोबाडीत मारत नसते. पाटील किंवा अन्य कुणी अशा अफवा पसरवित असतात. पण महाविकास आघाडीचे सरकार तीन वर्षे चालेल आणि त्यानंतरही महाविकास आघाडीच सत्तेत येईल. त्याबाबत त्यांनी निश्चित राहावे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.