मुंबई - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात राजकारणाचा शिरकाव झाल्याने मंत्री नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे यांच्यातच वाद रंगला होता. आता, याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आमने-सामने आली आहे. काही दिवसांपूर्वी मलिक यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा आणि त्यांच्या पत्नीचा ट्विट करुन खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे, भाजप नेत्यांनीही मलिक यांच्यावर आरोप केले आहेत. मलिक यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली, असा सवालही विचारला जात आहे. त्यावरुनच, आता भाजपा आमदार राम कदम यांनी 25 कोटी वसुली ही महाविकास आघाडीचा वाझे पार्ट 2 आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र सरकारचा वाजे पार्ट 2, असे म्हणत आमदार राम कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. ड्रग्स प्रकरणात किरण गोसावीने शाहरुख खानच्या मॅनेजर पूजा ददलानीकडून 25 कोटी रुपये मागितले, ही गोष्ट किरणचा माणूस प्रभाकर सेल सांगतोय? आता 25 कोटींची वसुली मागणारे किरण गोसावी राष्ट्रवादीचे नेते सुनिल पाटील यांचा यांचा माणूस असल्याचे समोर येत आहे. आता प्रश्न असा आहे की 25 कोटी वसुलीचे वाटेकरी कोण? हा नवीन वाझे आहे का? असा प्रश्नही राम कदम यांनी विचारला आहे.
ह्या वसुलीचे कोण कोण मंत्री आणि नेते वाटेकरी? हेच कारण आहे का, की संपूर्ण सरकार लोकांचे मूळ लक्ष्य ड्रग्समाफिया आणि वसुलीच्या मुद्द्यावरून वळवण्यासाठी अन् त्यांची वसुली निरंतर चालू राहावी म्हणून रोज पत्रकार परिषदा घेत आहेत?, असा सवाल कदम यांनी विचारला आहे. या संपूर्ण प्रकरणात ड्रग्समाफिया आणि शाहरुख खान यांच्याकडून वसुलीचा उद्देश होता? हे स्पष्ट आहे? सत्य लोकांसमोर यायला हवे, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी आमदार राम कदम यांनी केली आहे.
महाविकास आघाडीनेच सीबीआय चौकशीची मागणी करावी
जर महाविकास आघाडीने काही केलं नाही, तर घाबरण्याचे कारण नाही. त्यांनीच CBI च्या चौकशीची मागणी करावी तसेच किरण गोसावी, सुनील पाटील व इतर सर्व आवश्यक लोकांची नार्को टेस्ट करून देशासमोर पारदर्शकतेचे उत्तम उदाहरण प्रस्थापित करावे. देश नक्कीच स्वागत करेल ! अन्यथा वसुलिगेट part 2 ? सिद्ध होईल?, असेही कदम यांनी म्हटलं आहे.