"देश असमर्थ रेल्वे मंत्र्यांच्या अधीन"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 12:12 PM2024-10-27T12:12:39+5:302024-10-27T17:47:42+5:30
वांद्रे टर्मिनसवर रेल्वे पकडता चेंगराचेंगरी झाल्याने नऊ प्रवासी जखमी झाले आहेत.
Bandra Terminus Stampede : रविवारी सकाळी मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर रेल्वे पकडण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. दिवाळीनिमित्त परप्रांतीय मजूर आपापल्या गावी निघाले असताना मोठी गर्दी झाली होती. मोठ्या प्रमाणात आलेल्या प्रवाशांमुळे चेंगराचेंगरी झाली आणि नऊ जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या घटनेवरुन केंद्र सरकारला आणि रेल्वे मंत्र्यांवर टीकास्त्र डागलं आहे. रेल्वेमंत्री बुलेट ट्रेनच्या मस्तीमध्ये आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
वांद्रे टर्मिनस येथील फलाट क्रमांक १ वर रविवारी सकाळी चेंगराचेंगरी झाली. जखमींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर मुंबईतील भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गर्दी एवढी होती की पोलिसांनाही परिस्थिती आटोक्यात आणता आली नाही. वांद्रे गोरखपूर एक्स्प्रेस ट्रेन रेल्वे स्थानकावर येताच लोक त्यात चढण्यासाठी धडपड करू लागले. त्यामुळे काही प्रवासी फलाटावर पडले आणि चेंगराचेंगरी झाली. या घटनेत अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेवरुन आदित्य ठाकरे आणि नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे.
"वांद्रे टर्मिनस येथे चेंगचा चेंगरी होऊन अनेक लोक जखमी झाले आहेत. रेल्वेमंत्री मात्र बुलेट ट्रेनच्या मस्तीमध्ये आहेत. त्यांचे पाय जमिनीवर नाहीत आणि आमचे प्रवासी चेंगरुन मरत आहेत," अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
देश असमर्थ रेल्वे मंत्र्यांच्या अधीन - आदित्य ठाकरे
"रील मंत्री हे रेल्वे मंत्री असते तर बरं झालं असतं. सध्याचे रेल्वेमंत्री किती असमर्थ आहेत हे वांद्र्याच्या घटनेवरून दिसून येते. निवडणुकीसाठी भाजपने अश्विनी वैष्णव यांना भाजप महाराष्ट्राचे प्रभारी बनवले आहे. मात्र दर आठवड्याला रेल्वेत काही ना काही घटना आणि अपघात घडतच आहेत. आपल्या देशाला अशा असमर्थ मंत्र्यांच्या अधीन आहे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे," असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
नाना पटोलेंची टीका
"मुंबईतील वांद्रे टर्मिनलवर झालेली चेंगराचेंगरीची घटना दुर्दैवी आहे. या घटनेत जखमी झालेल्यांना योग्य उपचार मिळतील याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. सत्ताधाऱ्यांसाठी मुंबई शहर फक्त पैसा ओरबाडण्याची खाण आहे. सर्वाधिक कर भरून आणि हजारो कोटींच्या प्रकल्पाच्या घोषणा होऊनही मुंबईकरांना पायाभूत सुविधांसाठी झगडावं लागतंय. लोकल प्रवासी रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. एकदा बाहेर गेलेला माणूस घरी परत येईल की नाही याची खात्री नसते. काही वर्षांपूर्वी प्रभादेवी रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकजण मृत्यूमुखी पडलेलत्यानंतर वांद्रे येथे पुन्हा चेंगराचेंगरीच्या घटनेची पुनरावृत्ती होते. त्या घटनेतून सरकारने कोणतेच शहाणपण घेतल्याचे दिसत नाही! मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का?," असा सवाल नाना पटोले यांनी केला.