Vidhan Sabha Adhiveshan: माझ्यासह कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला हवं होतं; सरनाईकांची खदखद, राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 01:07 PM2021-07-05T13:07:03+5:302021-07-05T13:10:19+5:30
Vidhan Sabha Adhiveshan: प्रताप सरनाईक माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, माझ्याविरोधात गुन्हा नाही, मी कुठेही गायब झालो नव्हतो.
मुंबई: आजपासून दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात झाली असून विरोधक सरकारला घेण्याच्या तयारीत आहेत. याचदरम्यान, ईडीचा ससेमिरा मागे लागल्यापासून गायब असणारे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक विधानभवनात दाखल झाले. विधानभवनात दाखल झाल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा आघाडी सरकारविरोधातील खदखद बोलून दाखवली आहे.
प्रताप सरनाईक माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, माझ्याविरोधात गुन्हा नाही, मी कुठेही गायब झालो नव्हतो. माझ्या कुटुंबीयांवर घाला घातला जात होता किंवा आरोप केला जात होते, तेव्हा माझ्या मनात एकच विचार होता. आपण महाविकास आघाडीवर होणाऱ्या सर्व आरोपांना उत्तरे दिली अशा वेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या पाठी ठामपणे उभं राहायला हवं होतं. पण तसं झालं नाही. त्यामुळेच मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं. यामध्ये मी चुकीचं काही केलं असं वाटत नाही, असं प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे. प्रताप सरनाईकांच्या या विधानामुळे आता पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
माझ्या पक्षाच्या प्रतोदाने व्हीप बजावला आहे. त्यामुळे अधिवेशनाला आलो. देशात माझ्याविरोधात कोणताही एफआयआर दाखल नाही. माझ्यावर कुणीही लेखी स्वरुपात आरोप केलेला नाही. मी कोणत्याही घोटाळ्यात असल्याचा कुणीही जबाब दिलेला नाही. एमएमआरडीएच्या प्रकरणात माझ्यावर आरोप झाले. त्यावर एमएमआरडीएने आर्थिक गुन्हे शाखेकडे आणि ईडीकडे स्टेटमेंट दिलं आहे, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. तसेच देश सोडून जायला मी काही नीरव मोदी, मेहुल चोक्सी किंवा विजय मल्ल्या नाही, असंही प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान,राज्यात सरकारचा मनमानी कारभार सुरू आहे. आजच विधेयक मांडू आणि ते आजच पास करू असा कारभार रेटून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे. सरकारनं लोकशाहीला कुलूप लावलं आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात बोलताना केला आहे. प्रश्नोत्तरं, तारांकित प्रश्न नसल्यानं देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळानं आक्षेप व्यक्त केला.
Vidhan Sabha Adhiveshan: ३१ जुलै २०२१ पर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार; अजित पवारांची मोठी घोषणा https://t.co/IUE2gEtemG#MaharashtraAssemblySession2021@AjitPawarSpeaks
— Lokmat (@MiLOKMAT) July 5, 2021
प्रताप सरनाईक यांनी पत्रात नेमकं काय म्हटलं होतं?
प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन पानी पत्रं लिहून आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली होती. 10 जून रोजी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं होतं. सत्तेत असलेले राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असा दावा सरनाईक यांनी केला आहे. तसेच युती तुटली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तूटण्याआधी परत जुळवून घेतलेलं बरं होईल, असं त्यांनी पत्रात म्हटलं होतं.