महाविकास आघाडीचे जुळले, इच्छुकांचे टेन्शन वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 01:25 PM2023-06-01T13:25:57+5:302023-06-01T13:27:37+5:30

इच्छुक उमेदवारांमध्ये घालमेल

Mahavikas Aghadi maharashtra local body election the tension of the aspirants increased candidates | महाविकास आघाडीचे जुळले, इच्छुकांचे टेन्शन वाढले

महाविकास आघाडीचे जुळले, इच्छुकांचे टेन्शन वाढले

googlenewsNext

मुंबई : कर्नाटक विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत  महाविकास आघाडी  होणार असे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाहीर केले आहे. महाविकास आघाडीचे जुळल्यामुळे, इच्छुकांचे टेन्शन मात्र वाढले आहे. महाआघाडीत कोण मोठा, कोण धाकटा भाऊ?, आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगवेगळे लढणार का?, वंचित आघाडी सामील झाल्यावर त्यांना कोणत्या जागा सोडणार, यावर आतापासूनच चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाले आहे.

महाविकास आघाडी एकत्रित लढली तर २०१९ च्या वेळी विरोधात लढलेल्या उमेदवारांसमवेत परत एकत्रित लढावे लागणार, तसेच आपल्याला परत तिकीट मिळणार का? यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये टेन्शन तर उमेदवारांमध्ये घालमेल वाढली आहे. याचवेळी भाजपाकडून सापत्न वागणूक मिळत असल्याची तक्रार शिंदे गटाचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार व शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याचे चित्र आहे.

पितापुत्र लढतीची शक्यता?
मुंबईत दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मुंबई असे सहा लोकसभा मतदार संघ आहे. उत्तर मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मुंबई हे तीन लोकसभा मतदार संघ भाजपकडे आहे. 
शिवसेनेच्या फुटीनंतर दक्षिण मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, तर दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई हे शिंदे गटाकडे आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच जोगेश्वरी, गोरेगाव आणि दिंडोशी विधानसभेतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. 
या बैठकीत उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून शिवसेना उपनेते व युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित केल्याने विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांना पुन्हा येथून शिंदे गटाने तिकीट दिल्यास पिता-पुत्र अशी लढत होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

बैठकांचा सुरू आहे सिलसिला 
मुंबईत ३६ विधानसभा मतदार संघ असून महाविकास आघाडी तसेच भाजप -शिंदे गटाला कोणत्या जागा सुटणार आपल्यासमोर उमेदवार कोण असतील याचे आडाखे बांधले जात आहेत. यामुळे भाजप, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शिंदे गटाचे सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे, दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, यामिनी जाधव यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी सुरू केली असून मातोश्रीवर सध्या लोकसभा व विधानसभानिहाय बैठकांचा सिलसिला सुरू आहे. त्यामुळे आगामी महापालिका, लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी, भाजप-शिंदे गट यांच्यात अस्तित्वाची लढाई असल्याने या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये टेन्शन मात्र वाढल्याचे चित्र आहे.

दक्षिण मध्य मुंबईचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात वंचित आघाडीतून प्रकाश आंबेडकर किंवा माजी महापौर विशाखा राऊत यांना उद्धव ठाकरे उमेदवारी देणार का? 

दक्षिण मुंबईतून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्याऐवजी शिवसेना सचिव अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांना उत्तर मध्य मुंबईतून उतरवले जाईल, अशीही चर्चा आहे. 

महाविकास आघाडीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेच्या जागा मिळतील का, असा सवाल त्यांचे कार्यकर्ते करत आहे. एकंदरीत पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीनिमित्त राजकीय वर्तुळात रोज नवनव्या चर्चा ऐकायला मिळत आहे.

Web Title: Mahavikas Aghadi maharashtra local body election the tension of the aspirants increased candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.