मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा करण्याकरिता महाविकास आघाडीची बैठक या आठवड्यात मुंबईत होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना या बैठकीसाठी बोलविण्यात येणार आहे.
आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित बसून जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करावा आणि त्यानंतर घटक पक्षांच्या शीर्षस्थ नेत्यांची मान्यता घ्यावी, असे ठरले आहे. आधी महाविकास आघाडीच्या बैठकी झाल्या; पण अजूनही १४ ते १६ जागांबाबतचा तिढा कायम असल्याचे समजते. काँग्रेसची जिंकण्याची क्षमता नाही, असेही मतदारसंघ काँग्रेस मागत असल्यामुळे इतर घटक पक्षांची नाराजी असल्याचे समजते.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या साथीने शिवसेनेने २३ जागा लढल्या होत्या आणि १८ जिंकल्या होत्या. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) १८ पैकी १३ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत.
खासदार गेले असले तरी स्थानिक मतदार आणि शिवसैनिक आमच्या सोबत आहेत असे म्हणत शिवसेनेकडून अधिकाधिक जागा मागितल्या जात आहेत, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळेच जागावाटपाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होऊन देखील अद्यापही पूर्ण होऊ शकलेली नाही.