अतुल कुलकर्णी
मुंबई - महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर 34 व्या दिवशी होत आहे. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण 36 नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. सोमवारच्या शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा आहे. ठाकरे सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळात आमदार आदित्य ठाकरेंना स्थान मिळालंय. आदित्य ठाकरेसुद्धामंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात 25 कॅबिनेट मंत्री असणार आहेत.
महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा आज दुपारी विस्तार होत असून काँग्रेसचे दिल्लीतील नेते मल्लिकार्जुन खर्गे हेही मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत विधानभवनाच्या प्रांगणात सोमवारी दुपारी एक वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नव्या मंत्र्यांना शपथ देतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री उशिरा मंत्र्यांच्या नावांची यादी राजभवनावर पाठविली आहे. त्यामध्ये आदित्य यांचे नाव असल्याची खात्रीशीर माहिती आहे. आदित्य यांचं नाव गुप्त ठेवण्यात आलं होतं, शेवटपर्यंत कोणालाही आदित्य मंत्रिमंडळात येणार आहेत याचा सुगावा लागू दिला नव्हता. मात्र, राज्यपालांकडे जेव्हा रात्री उशिरा यादी गेली, त्यात आदित्य ठाकरेंचे नाव कॅबिनेट मंत्री म्हणून कॅबिनेट मंत्र्यांच्या यादीत सगळ्यात शेवटचे नाव असल्याचे समजते.
शामियाना उभारून शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवसेनेकडून माजी मंत्री तानाजी सावंत यांचा पत्ता कट करण्यात आला असून अब्दुल सत्तार यांना संधी देण्यात आल्याची माहिती आहे. शिवसेनेकडून काँग्रेसमधून शिवसेनेते प्रवेश केलेल्या अब्दुल सत्तार यांना राज्यमंत्री पद देण्यात आले आहे. तसेच, शंकरराव गडाख, बच्चू कडू आणि राजेंद्र पाटील-यड्रावकर या तीन अपक्ष आमदारांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपद देण्यात येत आहे. त्यात गडाख कॅबिनेट मंत्री असतील तर बच्चू कडू आणि राजेंद्र पाटील हे राज्यमंत्री असतील, अशी सुत्रांची माहिती आहे. ठाकरे पुत्र आदित्य यांनाही मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेही मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. दरम्यान, या आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सात मंत्र्यांच्या दिमाखदार शपथविधी सोहळा शिवाजी पार्कवर पार पडला होता.