संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
By दीपक भातुसे | Published: June 17, 2024 05:00 AM2024-06-17T05:00:58+5:302024-06-17T05:02:12+5:30
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यातील पक्षाची ताकद असलेल्या विधानसभा मतदारसंघांची माहिती जमा करण्याच्या सूचना पक्षातील नेत्यांना दिल्याचे समजते.
दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लोकसभा निवडणूक एकत्र लढवून राज्यात चांगली कामगिरी करणाऱ्या महाविकास आघाडीने आता विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चाचपणी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीला अजून चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र त्यापूर्वी निवडणुकीच्या तयारीला योग्य वेळ मिळावा म्हणून जागावाटप लवकर पूर्ण करण्याचा संकल्प महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी केला असल्याचे आघाडीतील एका नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
विजयाचा निकष
- शनिवारी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेपूर्वी मविआतील काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धवसेना या तीन प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपाची प्राथमिक बैठक झाली. सर्व पक्षांच्या विद्यमान आमदारांच्या जागांव्यतिरिक्त कोणत्या जागांवर कोणत्या पक्षाची ताकद आहे, याची चाचपणी प्रत्येक पक्ष आपल्या पातळीवर करणार आहे.
- त्यादृष्टीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यातील पक्षाची ताकद असलेल्या विधानसभा मतदारसंघांची माहिती जमा करण्याच्या सूचना पक्षातील नेत्यांना दिल्याचे समजते.
कोण किती जागांवर लढण्याची शक्यता?
काँग्रेस : १००-१०५
उद्धवसेना : ९०-९५
शरद पवार गट : ८०-८५
जिथे ताकद तिथे जागा
विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भाग, मुंबईतील काही भागांत काँग्रेसची ताकद आहे तिथे त्यांना जास्त जागा दिल्या जातील. कोकणासह मुंबई, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील काही भागांत उद्धवसेनेची ताकद आहे. शरद पवार गटाची पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागांत ताकद असल्याने त्यांना तिथल्या जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे.
सांगलीसारख्या चुका पुन्हा घडणार नाहीत
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात सांगलीत झालेल्या चुका यावेळी टाळण्याचा आघाडीचा प्रयत्न आहे. निवडून येण्याचा निकष ठेवून जागावाटप करण्याचा आघाडीचा प्रयत्न असेल, असे या नेत्याने याबाबत सांगितले. सामाजिक संघटनांशीही लवकरच चर्चा केली जाईल. तीनही पक्षांनी लोकसभा निवडणुकीत समन्वयाने प्रचार केला होता. मात्र लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणूक अधिक समन्वयाने आणि ताकदीने लढवण्याचा निर्धार आम्ही केल्याचेही या नेत्याने सांगितले.