मुंबई : महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणुकीतील जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. जागा वाटपावरून आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेस राज्य निवड मंडळाच्या बैठकीनंतर म्हणजे २७ आणि २८ फेब्रुवारीला आघाडीची बैठक होत आहे. या बैठकीत जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची बैठक गुरुवारी टिळक भवनमध्ये पार पडली. या बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना चेन्नीथला म्हणाले, महाविकास आघाडी मजबूत आहे. आम्ही जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न करत आहोत.
आंबेडकरांशीही चर्चा
सर्व मित्र पक्षांशी सातत्याने चर्चा सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील आंबेडकर यांच्याशी चर्चा करत आहेत. आंबेडकर यांनी दिलेल्या सर्व मुद्द्यांवर सहमती झाली आहे.