राज्यात महाविकास आघाडी, पालिकेत मात्र स्वबळाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 08:42 AM2021-08-17T08:42:35+5:302021-08-17T08:42:50+5:30

Mumbai : पालिकेच्या रणांगणात खरी लढाई शिवसेना विरूद्ध भाजप होणार असली तरी सभागृहात मात्र काँग्रेसकडे विरोधी पक्षनेते पद आहे.

Mahavikas Aghadi in the state, but self-reliance in the municipality | राज्यात महाविकास आघाडी, पालिकेत मात्र स्वबळाची तयारी

राज्यात महाविकास आघाडी, पालिकेत मात्र स्वबळाची तयारी

googlenewsNext

- गौरीशंकर घाळे

मुंबई : राज्य सरकारमधील महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग यशस्वीपणे सुरू असल्याचे चित्र उभे करण्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सध्या यशस्वी दिसते आहे. आगामी काळातील पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या प्रयोगाचा खरा कस लागणार आहे. त्यातही मुंबई महापालिका हा कळीचा मुद्दा बनणार आहे. पालिकेच्या रणांगणात खरी लढाई शिवसेना विरूद्ध भाजप होणार असली तरी सभागृहात मात्र काँग्रेसकडे विरोधी पक्षनेते पद आहे.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी तर मुंबई निवडणुकीचा रोडमॅप तयार असल्याचे म्हटले होते. आमच्याकडे मुंबई महापालिकेच्या २२७ जागांचा ''रोड मॅप'' तयार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक राजकीय परिस्थितीवर अवलंबून असतात, अशी भूमिका जगताप यांनी घेतली होती.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही. स्वबळावर लढायचे की कोणाशी आघाडी करायची याबाबत स्थानिक नेते निर्णय घेतील अशी राष्ट्रवादीची भूमिका असल्याचे पक्षाचे मुंबई अध्यक्ष आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अलीकडेच जाहीर केले. 
तर, शिवसेना मात्र कोणत्याही परिस्थितीत पालिकेवरील पकड सुटणार नाही, यासाठी मोर्चेबांधणी करून आहे. गटप्रमुख, शाखाप्रमुख अशा संघटनात्मक रचनेतून आमचे काम सुरूच असते. निवडणुकीसाठी म्हणून वेगळी तयारी करायची गरज नसते. आम्ही लोकांमध्येच असतो आणि सदैव तयारच असतो. आघाडीच्या बाबत योग्यवेळी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे शिवसेना नेते सचिन अहिर यांनी स्पष्ट केले.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने राज्यात महाविकास आघाडीचा नवा राजकीय प्रयोग यशस्वीपणे चालविला आहे. 
राज्यात एकत्र असलेले हे तिन्ही पक्ष मुंबई महापालिकेत मात्र एकमेकांच्या विरोधात बसले आहेत. पालिकेतील विरोधी पक्षनेते पद तर अधिकृतपणे काँग्रेसकडे आहे. युती सरकारच्या काळात भाजपने विरोधी पक्षनेते पदावरचा दावा सोडला होता.
राज्यातील युती तुटल्यानंतर संख्याबळाच्या आधारावर हे पद आपल्याकडे घेण्याचा भाजपचा प्रयत्न अयशस्वी ठरला. प्रकरण थेट न्यायालयापर्यंत पोहचले, पण भाजपला दिलासा मिळाला नाही. विरोधी नेतेपद काँग्रेसकडेच रहावे, यासाठी शिवसेनेने सर्वच आघाड्यांवर योग्य तजवीज केली. 
त्यामुळे मुंबई पालिकेत महाआघाडीचा हा भलताच प्रयोग सध्यातरी यशस्वी होताना दिसत आहे. काँग्रेसकडून पालिका प्रशासनावर टीका करताना शिवसेना नेतृत्वाबाबत मात्र काहीसे नरमाईचे धोरण दिसते.
 

Web Title: Mahavikas Aghadi in the state, but self-reliance in the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.