'पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रच लढणार'
By महेश गलांडे | Published: November 9, 2020 06:01 PM2020-11-09T18:01:11+5:302020-11-09T18:02:33+5:30
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्यावतीने सोमवारी सांगली जिल्ह्यातील भाजप नेते व सांगली जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली
मुंबई : राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. 1 डिसेंबर रोजी राज्यात पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 12 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे, राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येत आहे. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीकडून राज्यातील पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली. मात्र, आघाडीच्या पक्षांकडून उमेदवार देणे बाकी आहे. त्यातच, या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलंय.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्यावतीने सोमवारी सांगली जिल्ह्यातील भाजप नेते व सांगली जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर, मनसेकडून रुपाली पाटील ठोंबरे यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. त्यामुळे, पुण्यासह राज्यातील इतर पक्षांतही आघाडीचा उमेदवार कोण याची चर्चा रंगली आहे. त्यातच, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र मैदानात उतरणार असल्याचे बाळासाहेब थोरात सांगितले. तर, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत उमेदवार निश्चित केले जातील, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 'लोकमत'चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या 'माझी भिंत' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना थोरात यांनी याबाबत माहिती दिली. राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होतंय. त्यावेळी, लोकमतशी बोलताना या दोन्ही नेत्यांनी निवडणुकीसंदर्भात माहिती दिली.
एकाच जिल्ह्यात दोघांना उमेदवारी
पुणे पदवीधर मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादीत काट्याची लढत शक्य आहे. भाजपने सांगली जिल्ह्यातील देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडूनही याच जिल्ह्यातील अरुण लाड यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुणे पदवीधर निवडणुकीच्या राजकारणाच सांगली जिल्हा हे केंद्र बनणार आहे.
मनसेकडून रुपाली पाटील ठोंबरे
राज्यात पदवीधर मतदार संघांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. मनसेने पुणे पदवीधर निवडणुकीसाठी रुपाली पाटील यांना उमेदवारी जाहीर करत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना या प्रमुख पक्षांच्या अगोदर आघाडी घेतली आहे. तर, अभिजित बिचुकले यांनीही अपक्ष उमेदवार म्हणून पुन्हा एकदा पदवीधर संघाच्या निवडणुकीद्वारे राजकारणात जोरदार एंट्री घेतली आहे, ते आपले नशीब आजमावणार आहे.
भाजपाकडून उमेदवारांची यादी जाहीर
राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाने उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. १ डिसेंबरला पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे तर ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे. भाजपाकडून औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी शिरीष बोराळकर, पुणे पदवीधर मतदारसंघासाठी संग्राम देशमुख, नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी संदीप जोशी तर अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी नितीन धांडे यांच्या उमेदवारीची घोषणा दिल्लीवरून करण्यात आली आहे. शिरीष बोराळकर हे पंकजा मुंडे समर्थक म्हणून ओळखले जातात त्यामुळे या निमित्ताने पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी केला आहे.