Join us  

"विधानसभेला एकत्र लढून महाराष्ट्रात सत्ता काबीज करणार"; मविआबाबत संजय राऊतांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 3:50 PM

लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गट कामाला लागला असून यासाठी शिवसेना भवनात महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं.

Shivsena Meeting: लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. अशातच ठाकरे गटाकडून शिवसेना भवनात जिल्हा प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठीकनंतर बोलताना संजय राऊत यांनी विधानसभेला महाविकास आघाडी एकत्रित लढणार असल्याचे म्हटलं आहे. तसेच विधानसभेला १८० ते १८५ जागा जिंकू अशा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून जिल्हाप्रमुखांची शिवसेना भवनात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी जिल्हाप्रमुख तसेच पदाधिकारी उपस्थित होते. यासोबत उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला ठाकरे गटाचे सर्व खासदार आणि आमदार देखील उपस्थित होते. यावेळी लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि विधानसभा निवडणुकीसाठीच्या तयारीचा आढाव घेण्यात आला.

बैठकीनंतर खासदार संजय राऊत यांनी बाहेर येत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना संजय राऊत यांनी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित ताकदीने लढणार असल्याचे सांगितले. तसेच उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर मेळाव्यांचे देखील आयोजन करणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

"विधानसभेला महाविकास आघाडीमध्ये आम्ही निवडणूक लढू आणि महाराष्ट्रातील सत्ता काबीज करु. पण ते करत असताना जिल्हा प्रमुखांना आदेश देण्यात आले आहेत की, २८८ मतदारसंघामध्ये संघटनात्मक बांधणी आहे त्यापेक्षा मजबूत करण्यासाठी कामाला लागा. एखादी लढू अथवा न लढू तिथे संघटना मजूबत दिसली पाहिजे. ज्या महाविकास आघाडीने एकत्रित भाजपला दिल्लीतून बहुमत मुक्त केले त्याच महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीने एकत्र लढून १८० ते १८५ जागा जिंकणार आहे. पावसाळा जरी असला तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे," असे संजय राऊत यांनी म्हटलं.

टॅग्स :महाराष्ट्रउद्धव ठाकरेसंजय राऊतकाँग्रेस