Join us

सत्ता गेली तरी महाविकास आघाडी एकसंघ राहणार, पालिका निवडणुका एकत्र लढवण्याचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 7:30 AM

मुंबई :सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व नेते आणि आमदारांची पहिलीच बैठक मंगळवारी विधानभवनात पार पडली. २०१९ साली भाजपला ...

मुंबई :

सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व नेते आणि आमदारांची पहिलीच बैठक मंगळवारी विधानभवनात पार पडली. २०१९ साली भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. आता सत्ता गेली असली तरी महाविकास आघाडी एकसंघ ठेवण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारचा मुकाबला कसा करायचा त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. त्याचबरोबर जिथे शक्य असेल तिथे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. शिंदे-भाजप युतीचे सरकार जितके जास्त काळ टिकेल तर त्याचा फायदा महाविकास आघाडीलाच होईल, असाही सूर या बैठकीत उमटला.

उद्धव ठाकरे पहिल्यांदा विधिमंडळातमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे मंगळवारी प्रथमच विधानभवनात आले. उद्धव ठाकरे विधानपरिषदेचे आमदार आहेत. मात्र पावसाळी अधिवेशन सुरू होऊन चार दिवसांनी ठाकरे विधानभवनात आले. संध्याकाळी उशीरा विधानभवनात आलेल्या ठाकरे यांनी विधानपरिषदेत मात्र हजेरी लावली नाही. विधानभवनातील शिवसेनेच्या कार्यालयात आयोजित महाविकास आघाडीच्या बैठकीला ते उपस्थित होते. या बैठकीला शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीकडून अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्यासह तीनही पक्षांचे विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदार उपस्थित होते.

हे संकट काहीच नाही - उद्धव ठाकरेमहाविकास आघाडी सरकारने जगावर आलेल्या कोरोनासारख्या संकटाचा सामना केला आहे, आता आलेले संकट काहीच नाही, असे वक्तव्य करत एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीचा तीनही पक्ष एकत्र सामना करणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी सूचित केले. आम्ही फुटलेलो नाही, एकत्र आहोत, असे सांगत महाविकास आघाडी एकसंघ असल्याचेही त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, सगळ्यांना समान न्याय असावा म्हणून न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते. त्याचबरोबर आणखी एक न्यायदेवता असते, ती म्हणजे जनता आणि ही जनता डोळे उघडे ठेवून सगळे बघत असेत. जोपर्यंत जनता आहे तोपर्यंत लोकशाही आहे आणि लोकशाही आहे तोपर्यंत बेबंदशाही येणार नाही.

टॅग्स :उद्धव ठाकरे