Join us

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी जिंकेल ४८ पैकी ४५ जागा, संजय राऊत यांचं मोठं भाकित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 11:58 PM

Sanjay Raut News: तिन्ही पक्ष एकत्र लढले तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतMahavikas Aghadi ला ४८ पैकी ४५ जागा मिळतील असं भाकित संजय राऊत यांनी केलं आहे.

मुंबई - राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त या सरकारच्या स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काय परिस्थिती असेल याचं भाकित केलं आहे. तसेच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडी होण्यात मला काहीच अडचण वाटत नाही. तसेच तिन्ही पक्ष एकत्र लढले तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ४८ पैकी ४५ जागा मिळतील असं भाकित संजय राऊत यांनी केलं आहे.

याबाबत संजय राऊत म्हणाले की, २०२४ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचंच मॉडेल दिसेल यात मला काही अडचण दिसत नाही. काँग्रेससह महाविकास आघाडी होईल यामध्येही मला काही अडचण येईल, असं वाटत नाही. तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो तर ४८ पैकी ४५ जागा आम्ही जिंकू. आज काँग्रेसची एकच जागा आहे. जर एकत्र लढलो तर काँग्रेसलाही लाभ होईल. त्यांच्या एकच्या पाच जागा होतील. मात्र प्रत्येकानं संयम आणि मर्यादा ठेवल्या पाहिजेत, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला.

दरम्यान, राज्यात अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यानुसार राज्याचा मुख्यमंत्री बदलणार असल्याच्या चर्चांना संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे. अशा पुड्या कोण सोडतो मला माहिती नाही. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले तेव्हाच्या प्रक्रियेमधील मी एक साक्षीदार आहे. तसेच एक क्रियाशील कार्यकर्ताही होतो. कुणाच्या डोक्यात कल्पना नव्हती. तेव्हा निकाल सुरू असताना मी शरद पवारांकडे जाऊन असं होऊ शकतो असं सांगितलं. तेव्हा काय चर्चा झाल्या हे मला माहिती आहे. तेव्हा शरद पवार यांनी राज्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे पूर्ण वेळ करणार असं स्पष्ट केलं होतं. या सरकारचा कालखंड पाच वर्षांचा आहेत त्याच्या मनात शंका नाही, तसेच कुणीही किती खेचाखेची केली तरी सरकार पडणार नाही, असे ते म्हणाले. 

टॅग्स :संजय राऊतमहाविकास आघाडी