मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मुंबईत आज महाविकास आघाडीकडून 'जोडो मारो आंदोलन' केले जाणार आहे. दरम्यान, पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली आहे. मात्र, तरीही महाविकास आघाडी आजच्या आंदोलनावर ठाम आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी आज गेटवे ऑफ इंडियावर जोडे मारो आंदोलन करणार आहे. तसेच, या आंदोलनाला परवानगी नसताना देखील महाविकास आघाडी या आंदोलनावर ठाम आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी सकाळी १० वाजल्यापासून बंद राहणार आहे.या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले यांसह महाविकासआघाडीतील अनेक दिग्गज नेते सहभागी होणार आहेत.
महाविकास आघाडीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया सकाळी दहा वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तिथे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून निषेध व्यक्त केला जाणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, पोलिसांनी मुंबईतही चोख बंदोबस्त ठेवला आहे.
दरम्यान, छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालघरच्या कार्यक्रमात जाहीर माफी मागितली आहे. तसेच त्याच ठिकाणी नव्याने दिमाखदार पुतळा उभारण्याचे आश्वासन देखील महायुती सरकारने यावेळी दिले आहे. तरीही विरोधक केवळ या दुर्घटनेचे राजकारण करत असल्याची भूमिका घेत प्रदेश भाजप युवा मोर्चाच्या वतीने आज राज्यभरात आंदोलन केले जाणार आहे.