महावितरण, बेस्ट, टाटा, अदानी या कंपन्यांनी वाढवले दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2023 06:19 AM2023-04-02T06:19:16+5:302023-04-02T06:21:09+5:30
नव्या आर्थिक वर्षात सामान्यांच्या खिशावर मोठ्या प्रमाणात भर
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नव्या आर्थिक वर्षात सामान्यांच्या खिशावर मोठ्या प्रमाणात भर पडणार असल्याचे स्पष्ट झाले असतानाच आता पुढील महिन्यापासून घरी येणाऱ्या वीजबिलाचे आकडेही फुगलेले असतील. महावितरण, बेस्ट, टाटा आणि अदानी या वीज कंपन्यांनी विजेच्या दरवाढीसाठी दाखल केलेल्या याचिकेला वीज नियामक आयोगाने मंजुरी दिली असून, १ एप्रिलपासून विजेचे नवे दर लागू झाले आहेत.
महावितरणने सहा वर्षांतील महसुली तूट भरून काढण्यासाठी २०२३-२४ व २०२४-२५ या दोन आर्थिक वर्षात दरवर्षी अनुक्रमे १४ टक्के आणि ११ टक्के सरासरी दरवाढ प्रस्तावित केली होती. ही सरासरी प्रस्तावित दरवाढ १ रुपयाच्या जवळपास होती. प्रस्तावित सरासरी दरवाढीमध्ये स्थिर आकार, वीज आकार व वहन आकार यांचा समावेश केला होता. आयोगाने यावर २०२३-२४ साठी २.९ टक्के आणि २०२४-२५ साठी ५.६ टक्के वाढ केली आहे. उच्च दाब औद्योगिक वर्गवारीमधील विजेच्या एकूण सरासरी किमतीमध्ये १ टक्के वाढ होईल तर लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांच्या विजेच्या किमतीमध्ये सरासरी १ टक्क्याची घट होईल. वाणिज्यिक वापराच्या विजेच्या किमतीमध्येदेखील लघु आणि उच्च दाब श्रेणीत सरासरी १ टक्क्याची घट दर्शविण्यात आली आहे.
बेस्ट (सरासरी वार्षिक वाढ)
२०२३-२४ साठी : ५.७ टक्के
२०२४-२५ साठी : ६.३५ टक्के
अदानी (सरासरी वार्षिक वाढ)
२०२३-२४ : २.२ टक्के
२०२४-२५ : २.१ टक्के
टाटा (सरासरी वार्षिक वाढ)
२०२३-२४ : ११.८८ टक्के
२०२४-२५ : १२.१९ टक्के
यांना सवलत...
- ई बिलाचा वापर करणाऱ्या ग्राहकांना दरमहा प्रत्येक बिलामागे १० रुपयांची सूट
- डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा या मार्गाने बिल भरणाऱ्या वीज ग्राहकांना दरमहा प्रत्येक बिलामागे पाचशे रुपयांच्या अधीन राहून ०.२५ टक्के सवलत
असे नवे दर (रुपये)
बेस्ट
युनिट दर
० ते १०० ३.६९
१०१ ते ३०० ७.०४
३०१ ते ५०० १०.६३
५०१ वर १२.६०
अदानी
युनिट दर
० ते १०० ५.६६
१०१ ते ३०० ७.७६
३०१ ते ५०० ९.६६
५०१ वर १०.७६
टाटा पॉवर
युनिट दर
० ते १०० ४.७३
१०१ ते ३०० ७.३३
३०१ ते ५०० १०.९८
५०१ वर ११.६३
महावितरण
युनिट दर
० ते १०० ४.४१
१०१ ते ३०० ९.६४
३०१ ते ५०० १३.६१
५०१ वर १५.५७
ग्राहकांच्या वीजदरांवर परिणाम झाला तर अनुकूल वीज खरेदी खर्चामुळे ते भविष्यातील काही महिन्यांत इंधन समायोजन शुल्कामध्ये योग्यरीत्या समायोजित केले जाईल. बाजारातील स्पर्धात्मक स्थिती टिकवून ठेवण्यासाठी वीजदरामध्ये सुधारणा करण्याकरिता ही सूचना आयोगाकडे देखील योग्यरीत्या सादर केली जाईल. - टाटा पॉवर
वीजखरेदी खर्च अनुकूलतेमुळे आम्ही केलेली दरवाढ ही महाराष्ट्रात तुलनेत कमी आहे. आजच्या अस्थिर इंधनाच्या किमतींच्या स्थितीतदेखील यामुळे प्रस्तावित दरवाढ होऊ शकते. - अदानी इलेक्ट्रिसिटी