महावितरण अभियंता, कर्मचाऱ्यास मारहाणप्रकरणी सहा महिने सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 05:50 AM2018-09-21T05:50:03+5:302018-09-21T05:50:12+5:30
अकोला जिल्ह्यातील महावितरणच्या कनिष्ठ अभियंता व कर्मचा-याला झालेल्या मारहाणप्रकरणी अकोला न्यायालयाने आरोपीला सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
मुंबई : थकबाकीदार ग्राहकांकडे वीजबिल वसुली आणि विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या अकोला जिल्ह्यातील महावितरणच्या कनिष्ठ अभियंता व कर्मचा-याला झालेल्या मारहाणप्रकरणी अकोला न्यायालयाने आरोपीला सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. अकोला येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एम.डी. सैंदाणी यांच्या न्यायालयाने बुधवारी हा निकाल दिला, अशी माहिती महावितरणने दिली.
१८ सप्टेंबर २०१६ रोजी अकोला जिल्ह्यातील महावितरणच्या कुरणखेड शाखा कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता कपिल हिरामण वाकोडे आणि कर्मचारी पी.डी. वानखडे व आर.जी. गुल्हाणे हे थकीत वीजबिल वसुलीसाठी तसेच थकबाकीदार ग्राहकांची वीज जोडणी खंडित करण्यासाठी दाळंबी या गावात गेले होते.
या वेळी वीजबिलाची थकबाकी असलेले गावातील जालंदर पुंजाजी वानखडे, प्रमिला जालंदर वानखडे व अनिता गजानन कांबळे यांनी वीजपुरवठा खंडित करण्यास मनाई करीत साहाय्यक अभियंता वाकोडे
व सोबत असलेल्या कर्मचाºयांना शिवीगाळ करून मारहाणदेखील केली होती.
न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून तसेच साक्षी-पुराव्यांनुसार आरोपी जालंदर पुंजाजी वानखडे याला कलम ३३२, ३५३ नुसार सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा व दोन हजार रुपये दंड ठोठावला आहे. सरकार पक्षाच्या वतीने विशेष सहायक सरकारी अभियोक्ता विजय पांचोली यांनी युक्तिवाद केला.