Join us

महावितरणाच्या ग्राहकांना मिळणार घरबसल्या सुविधा; वीज बील भरा ऑनलाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 11:27 AM

महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर 'ऑनलाइन प्रणालीद्वारे इतर देयकांचा भरणा' या लिंकवर ही सुविधा उपलब्ध आहे

मुंबई - वीज सेवाविषयक बहुतांश देयके भरण्यासाठी आता ग्राहकांना महावितरणच्या कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. वीजबिल व नवीन जोडणीच्या शुल्कासह महावितरणने आता आपल्या इतर देयकांचाही ऑनलाईन  भरणा करण्यासाठी ग्राहकांना पर्याय उपलब्ध करून दिला आहे. वीज ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

मानवी हस्तक्षेप टाळून ग्राहकांना वीजविषयक सर्व सेवा ऑनलाईन देण्याच्या उद्देशाने महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरण माहिती तंत्रज्ञानावर आधारित विविध उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवित आहे. त्याअंतर्गत नवीन वीजजोडणीचे शुल्क आणि वीजबिलाचा भरणा ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना यापूर्वीच उपलब्ध करून दिली आहे. आता नवीन मीटरचे शुल्क (नादुरुस्त मीटरची किंमत ग्राहकाकडून वसूल करावयाची असल्यास), मीटर तपासणी, सीटी/पीटी तपासणी शुल्क, मीटर इतरत्र बसविण्यासाठीचे शुल्क ऑनलाईन भरण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर 'ऑनलाइन प्रणालीद्वारे इतर देयकांचा भरणा' या लिंकवर ही सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेमुळे संबंधित देयक भरण्यासाठी ग्राहकांना महावितरणच्या कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही. तसेच देयकाचा भरणा ऑनलाईन झाल्याने निश्चित कालमर्यादेत काम पूर्ण करणे सुलभ होईल. या उपलब्ध सुविधेचा अधिकाधिक ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :महावितरणवीजऑनलाइन