Join us

पदपथांवर महावितरणचे मृत्यूचे सापळे, गंजलेल्या डीपी, उघड्यावर वाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 3:03 AM

गंजलेल्या डीपी, उघड्यावर वायर : अनेक दुर्घटनानंतरही दुरुस्तीकडे डोळेझाक; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न

सूर्यकांत वाघमारे 

नवी मुंबई : महावितरणच्या हलगर्जीमुळे शहरात जागोजागी, पदपथांवर मृत्यूचे सापळे तयार झाले आहेत. त्या ठिकाणी उघड्यावर पडलेल्या वायर, गंजलेल्या डीपीपासून अनेकांना शॉक लागण्याच्या घटना घडत असतानाही दुरुस्तीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. यामुळे महावितरणच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे.

घणसोली सेक्टर-७ येथे पदपथावर उघड्यावर पडलेल्या विद्युत वायरचा शॉक लागून साई वाडकर (०८) याचे दोन्ही पाय जळाल्याची घटना गतमहिन्यात घडली. या प्रकरणी जखमी साईवर अद्यापही उपचार सुरूच आहेत. दरम्यान, मागील काही वर्षांत शहरात इतरही अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. तर उघड्या डीपीला स्पर्श झाल्याने घणसोली गावामध्ये राहणाऱ्या एका लहान मुलाचे प्राणही गेले आहेत. यानंतरही महावितरणकडून उघडे डीपी व पदपथांवरील वायर यांचे गांभीर्य घेतले जात नसल्याचे पाहायला मिळत आहे, यामुळे शहरातील पदपथांवर मृत्यूचे सापळे तयार झाले आहेत. विद्युत वायरसाठी डक्ट नसल्याने रस्त्यालगत खोदून अथवा पदपथांवरून उघड्यावरून वायर नेल्या जात आहेत. शहरातील प्रत्येक विभागामध्ये जागोजागी अशा प्रकारच्या विद्युत वायरचे जाळे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी पदपथांवरच विद्युत वायरची जोडणीही करण्यात आलेली आहे.नवीन व्यावसायिकांना वीजजोडणी देण्यासाठी वापरलेल्या वायरही पदपथावरच उघड्यावर टाकल्या जात आहेत. अशाच प्रकारे उघड्यावर पडलेल्या विद्युत वायरला स्पर्श झाल्याने साई वाडकर हा गंभीर जखमी झाला.प्रतिवर्षी पावसाळ्यात उघड्या डीपीत पाणी गेल्याने अथवा वायरची जोडणी असलेल्या ठिकाणी पाणी साचल्यास शॉक लागण्याचे प्रकार घडतात. तर उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात आगीच्याही घटना घडतात. शाळा-महाविद्यालयाच्या आवारात, उद्यानांच्या बाहेर, बस थांब्यालगत अशा नादुरुस्त डीपी व उघड्यावरील वायर आहेत.

रोज त्या ठिकाणावरून प्रवास करणाºया पादचाºयांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. तर काही ठिकाणी डीपीला लागूनच वाहनांची पार्किंग होत असल्याने एखादी आगीची दुर्घटना घडल्यास संपूर्ण परिसरात अग्नितांडव होण्याची शक्यता नाकारता येत नाही, यामुळे महावितरणकडून उघड्यावरील विद्युत वायर भूमिगत करण्याची, तसेच गंजलेल्या डीपी बदलून त्या बंदिस्त केल्या जाण्याची गरज आहे. महावितरणने प्रत्येक विभागामध्ये बंदिस्त सबस्टेशन उभारण्यात आले आहेत. त्यापैकी कोपरखैरणे, घणसोली, नेरुळ तसेच इतर ठिकाणची सबस्टेशन भिकाºयांच्या राहण्याची जागा अथवा गर्दुल्ल्यांचे अड्डे बनले आहेत.पदपथ हे नागरिकांच्या चालण्यासाठी असतानाही त्यावरून विद्युत वायरची उघड्यावर जोडणी केली जात आहे, तर काही ठिकाणी डीपीसुद्धा पदपथांवर असल्याने पादचाऱ्यांना अडथळा होत आहे. पदपथांवरील विद्युत वायरपासून वाचण्यासाठी त्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. यामध्ये दोन्ही ठिकाणी पादचाºयांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. काही ठिकाणी डीपीच्या खालची जागा व्यावसायिकांकडून साहित्य साठवण्यासाठी अथवा कचरा टाकण्यासाठी वापरली जात आहे. यामुळे आगीची घटना घडल्यास मोठी दुर्घटना घडू शकते; परंतु अशा प्रकारांकडून महावितरणच्या अधिकाºयांकडून दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. 

टॅग्स :मुंबई