Join us

महावितरणची वीजगळती बेस्ट, टाटाच्या तुलनेत अधिक; नियमित वीज बिल भरणाऱ्यांवर भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 2:44 AM

भांडुप आणि मुलुंडसह राज्यभरात वीजपुरवठा करत असलेल्या महावितरणला गळतीवर उपाय सापडलेला नाही. परिणामी, विजेची चोरी, हानी या घटकांमुळे वीजगळती वाढत आहे.

मुंबई : भांडुप आणि मुलुंडसह राज्यभरात वीजपुरवठा करत असलेल्या महावितरणला गळतीवर उपाय सापडलेला नाही. परिणामी, विजेची चोरी, हानी या घटकांमुळे वीजगळती वाढत आहे. २०१७-१८ या वर्षाचा विचार करता महावितरणची महानगरांसह शहरांमधील वीजगळती मुंबई शहर आणि उपनगरात वीजपुरवठा करत असलेल्या बेस्ट आणि टाटा पॉवर या वीज कंपन्यांच्या तुलनेत अधिक असून, गळतीमुळे महावितरणला तीन हजार कोटींचा फटका बसला आहे.२०१७-१८ साली महावितरणने १ कोटी २३ लाख दशलक्ष युनिट वीजपुरवठा केला असून, महानगरांसह शहरांमधील महावितरणच्या गळतीचे प्रमाण ५ हजार ८०० दशलक्ष युनिट आहे. महावितरणचे राज्यात २ कोटी ४० लाख वीज ग्राहक असून, गळतीचे प्रमाण हे सरासरी १७ टक्के आहे. महानगरांचा विचार करता गळतीचे प्रमाण ८ टक्के, शहरातील फिडरवर गळतीचे प्रमाण ३० टक्के आहे. महावितरणची तुलना टाटा आणि बेस्टसोबत केली, तर बेस्टच्या गळतीचे प्रमाण १.२२ टक्के, टाटाच्या गळतीचे प्रमाण ६.५ टक्के आहे. बेस्ट, टाटाच्या तुलनेत हे प्रमाण दुप्प्पट असून, महावितरणला गळती रोखता आलेली नाही. गळतीमुळे महावितरणला तीन हजार कोटींचा फटका बसला आहे. विजेच्या वहनादरम्यान होणारी विजेची चोरी, चुकीचे रीडिंग; या घटकांमुळे गळतीचे प्रमाण अधिक आहे. गळती होत असलेल्या विजेचे बिलिंग होत नाही. परिणामी याचा भार नियमित वीज बिल भरणाऱ्यांवर पडत आहे.ग्राहकांना दिलेली वीज व त्याचे होणारे बिलिंग यात तफावत राहते. परिणामी महावितरणचा तोटा होत आहे. याचा परिणाम ग्राहकसेवेवर होत आहे. ग्राहकांनी वापरलेल्या युनिटची वसुली होणे अपेक्षित आहे. मीटर रीडिंग एजन्सीने रीडिंग घेतल्यानंतर महावितरणमार्फत त्या रीडिंगचे क्रॉस चेकिंग होणे गरजेचे आहे. सेंट्रलाइज बिलिंगवर काम करणे गरजेचे आहे. कार्यवाही अपेक्षित होत नसल्याने समस्या सुटण्याऐवजी वाढतच आहे. युनिटची वसुली होण्यासाठी अचूक बिलिंग होणे गरजेचे आहे. याकरिता मीटर चेकिंग एजन्सीवर नियंत्रण ठेवावे. एजन्सीने रीडिंग घेतल्यानंतर रीडिंगचे कर्मचाºयांनी क्रॉस चेकिंग करावे. यामुळे कामात हयगय करणाºया एजन्सीवर कारवाई करणे सोपे होईल, असे निर्देश देण्यात आले.या ठिकाणी प्रमाण सर्वाधिकमुंबईमधील भांडुप, नवी मुंबईमधील वाशी, नेरूळ, पनवेल, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, ठाणे, पुण्यातील कोथरूड, शिवाजीनगर, खडकी, हडपसर, नगर रोड, पर्वती, अकोला, अमरावतीमधील अचलपूर, औरंगाबाद, जालना, सातारा, बार्शी, सोलापूर, चंद्रपूर, गोंदिया, कोल्हापूर, लातूर, सांगली, बीड, उदगीर, नांदेड, मालेगाव, नाशिक, भोसरी, पिंपरी येथे मोठ्या प्रमाणावर वीजगळती होत आहे.वीजगळतीचे प्रमाण महानगरांत १० आणि शहरांमध्ये ५ टक्क्यांखाली असावे, असे निर्देश देऊ नही कार्यवाही शून्य आहे.उपाययोजना करण्यास सुरुवातही वीजगळती रोखण्यासाठी महावितरणकडून उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार, ज्या भागात वीजगळती जास्त आहे, अशा परिसरात पथक तयार करून तपासणी करावी, मीटरशी छेडछाड करणाºया ग्राहकांवर कारवाई करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.कोट्यवधींची थकबाकी : औद्योगिक आणि वाणिज्यिक वीज ग्राहकांनी महावितरणची कोट्यवधींची वीजबिले थकविली आहेत. औद्योगिक आणि वाणिज्यिक वीज ग्राहकांनी थकविलेल्या वीजबिलांचा आकडा तब्बल ३९ कोटी १८ लाख ६६ हजार ५८९ रुपये एवढा आहे. कल्याण झोनमधील कल्याण सर्कल एक, दोन, तीन, पालघर आणि वसई सर्कलमधील हे वीजग्राहक आहेत. दरम्यान, राज्यभरातील विविध प्राधिकरणांनी महावितरणच्या वीजबिलांची रक्कम थकविली असून, ती वसूल करणे महावितरणसमोर एक मोठे आव्हान आहे.

टॅग्स :महावितरण