महावितरणचे मोबाईल ॲप ५० लाखांपेक्षा अधिक वेळा डाऊनलोड

By सचिन लुंगसे | Published: January 6, 2023 05:25 PM2023-01-06T17:25:26+5:302023-01-06T17:26:30+5:30

"ॲप डाऊनलोड करून ते सतत वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या २८ लाखांपेक्षा अधिक असून महावितरणच्या एकूण ग्राहकांचा विचार करता प्रत्येकी दहापैकी एक ग्राहक हे ॲप नियमित वापरत आहेत."

Mahavitran's mobile app downloaded more than 5 million times | महावितरणचे मोबाईल ॲप ५० लाखांपेक्षा अधिक वेळा डाऊनलोड

महावितरणचे मोबाईल ॲप ५० लाखांपेक्षा अधिक वेळा डाऊनलोड

मुंबई : विद्युत ग्राहकांना नवीन वीज कनेक्शन घेण्यापासून बिले भरणे, तक्रारी नोंदविणे आणि वीजचोरीची खबर देणे अशा विविध सुविधा असलेल्या महावितरणच्या मोबाईल ॲपला ग्राहकांचा प्रतिसाद मिळत असून मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या ५० लाखांपेक्षा अधिक झाली आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली. 

ते म्हणाले की, ॲप डाऊनलोड करून ते सतत वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या २८ लाखांपेक्षा अधिक असून महावितरणच्या एकूण ग्राहकांचा विचार करता प्रत्येकी दहापैकी एक ग्राहक हे ॲप नियमित वापरत आहेत. ऊर्वरित ग्राहकांकडून ॲपचा वापर कमीअधिक कालावधीने होतो. 

ते म्हणाले की, महावितरणच्या ग्राहकांना मोबाईल ॲपचा वापर करून महावितरणच्या अनेक सेवा सहजपणे मोबाईल फोनवरून मिळविता येतात. नवीन कनेक्शनसाठी अर्ज करणे, त्यासाठीची कागदपत्रे अपलोड करणे आणि त्यासाठीची फी भरून नवीन कनेक्शन मिळविणे ही सुविधा ॲपमार्फत उपलब्ध आहे. या ॲपवरून ग्राहकांना आपले विजेचे बिल पाहता येते आणि भरताही येते. वीजबिलाची नोटिफिकेशन आणि बिल भरल्याची माहिती या ॲपद्वारे उपलब्ध होते.

ग्राहकांना वीजेच्या बाबतीत तक्रार नोंदविणे आणि आपल्या तक्रारीवर पुढे काय कारवाई झाली याची माहिती घेणे ॲपमुळे सोपे जाते. वीजचोरीची खबर देण्याचीही सुविधा या ॲपवर उपलब्ध आहे. मोबाईल ॲपवरून ग्राहकांना आपल्या मीटरचे रिडिंग स्वतःच भरता येते. जवळचे महावितरणचे कार्यालय अथवा बिल भरणा केंद्र कोठे आहे आणि तेथे कसे जायचे, याचीही माहिती ॲपवरून मिळते, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, महावितरणच्या मोबाईल ॲपवरून विजेचे बिल भरण्यासाठी एप्रिल २०२१ मध्ये १० लाख ९७ हजार व्यवहार झाले होते व त्यावरून १५८ कोटी रुपयांची बिले भरण्यात आली होती. नोव्हेंबर २०२२ मध्ये व्यवहारांची संख्या १५ लाख ८९ हजार झाली होती व त्या माध्यमातून २३७ कोटी रुपयांची बिले भरण्यात आली होती. अर्थात या कालावधीत मोबाईल ॲपवरून होणाऱ्या व्यवहारांची संख्या ४४ टक्क्यांनी वाढली तर भरलेल्या बिलांच्या रकमेचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढले. 

नोव्हेंबर २०२२ या महिन्यात महावितरणच्या घरगुती ग्राहकांनी एकूण २१०४ कोटी रुपयांची बिले विविध माध्यमातून ऑनलाईन भरली होती. त्यापैकी मोबाईल ॲपवरून २३७ कोटी रुपयांची बिले भरण्यात आली. मोबाईल ॲपचे बिल भरण्याखेरीज अनेक उपयोग ध्यानात घेता त्याचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
 

Web Title: Mahavitran's mobile app downloaded more than 5 million times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.