ठाणे : वीजचोरी आणि गळती रोखण्यासाठी महावितरण नव्या वर्षात नवी मोहीम हाती घेणार आहे. यापूर्वी महावितरणच्या स्थानिक कर्मचाऱ्यांची भरारी पथके तयार करून वीजचोरांवर कारवाई केली जात होती. त्यातील आर्थिक हितसंबंध उघड होऊ लागल्याने आता या कामी दुसऱ्या सर्कलमधील कर्मचाऱ्यांची मदत घेऊन चोरांना कारवाईचा ‘शॉक’ दिला जाणार आहे. ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा व्हावा, मागेल त्याला वीज मिळावी आणि उद्योगांसाठी विशेष स्वतंत्र यंत्रणा उभारण्यावर महावितरण नव्या वर्षात भर देणार आहे. नव्या वर्षात वीजगळती-चोरी रोखण्यासाठी महावितरणच्या स्थानिक कर्मचाऱ्यांकडून कारवाई न करता, इतर सर्कलमधील कर्मचाऱ्यांची मदत घेऊन कारवाई केली जाणार आहे. या पथकात १० कर्मचारी असतील. हे पथक मीटर तपासणी, आकडा टाकून होणारी वीजचोरी, मीटर बायपास चोरीचा छडा लावेल. यापूर्वी स्थानिक कर्मचाऱ्यांमार्फत अशा प्रकारे मोहीम राबविली जात होती, परंतु त्या वेळेस आर्थिक हितसंबंध अथवा ओळखीचा फायदा घेत, कारवाईत चालढकल केली जाई. त्यामुळे गळतीचे प्रमाण कमी होत नव्हते. म्हणूनच महावितरणने नवी शक्कल लढविली आहे. यामुळे आर्थिक हितसंबंधांना आळा तर बसेल, शिवाय वीजचोरी रोखण्यासही मदत होईल.ठाणे परिमंडळात सध्या घरगुती, वाणिज्य लघुवाद औद्योगिक, उच्चदाब, इतर असे मिळून आठ लाख ७४ हजार ७३९ वीजग्राहक आहेत. प्रत्येक महिन्याला एक घरगुती वीजग्राहक सरासरी १७०, कमर्शिअल ३८० आणि औद्योगिक ग्राहक १,६९३ युनिट विजेचा वापर करतो, तरीही अनेक भागांना वीजचोरी आणि गळतीच्या समस्येला सामोरे जावे लागते. ठाण्यात वीजचोरीचे प्रमाण कमी असले, तरी कळवा, मुंब्रा आणि दिवा भागांत ते सुमारे १२ टक्क्यांच्या आसपास असून, थकबाकीदारांचे प्रमाणही याच भागात अधिक असल्याची माहिती महावितरणने दिली आहे. (प्रतिनिधी)मागेल त्याला वीजनववर्षात ग्राहकाभिमुख सेवा देण्याचा मानस महावितरणने व्यक्त केला असून, मागेल त्याला वीज देण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु ही वीज देत असताना वीजबचत, विजेचा वापर कसा करावा, आदींचे संदेशही त्यांना दिले जाणार आहेत. अस्तित्वात असलेल्या रोहित्रांची क्षमता वाढविणे, नवीन रोहित्र बसविणे, भूमिगत वाहिनी टाकण्यावर भर देणे आदी कामेही केली जाणार आहेत.
वीजचोरांना महावितरणचा ‘शॉक’
By admin | Published: January 01, 2016 2:25 AM