उत्तर मुंबईत आठ ठिकाणी रक्तदानाचा महायज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2021 04:04 AM2021-05-02T04:04:01+5:302021-05-02T04:04:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना काळात अनेक अडचणी येत असून वेगवेगळ्या प्रकारची औषधे, इंजेक्शनची कमतरता असल्याने रुग्ण आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना काळात अनेक अडचणी येत असून वेगवेगळ्या प्रकारची औषधे, इंजेक्शनची कमतरता असल्याने रुग्ण आणि नातेवाइकांची धावपळ होत आहे. त्यामध्ये रक्ततुटवडा जाणवू नये म्हणून उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी या लोकसभा मतदारसंघात भाजप आणि विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने ५ हजार रक्त पिशव्या संकलन करण्याचा संकल्प केला आहे. ५ एप्रिल या भाजप स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येपासून आजपर्यंत एकूण १९ रक्तदान शिबिरांत एकूण २६३२ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधत उत्तर मुंबईत शनिवारी आठ ठिकाणी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरांमध्ये एकूण ५४८ पिशव्या रक्त संकलन झाल्याची माहिती खासदार गोपाळ शेट्टी यांनी ‘लोकमत’ला दिली.
विशेष म्हणजे उत्तर मुंबईतील रक्तदान शिबिरात युवा पिढी व महिलाही पुढे येत आहेत. भाजप वॉर्ड क्रमांक ८ च्या वतीने नगरसेवक हरीश छेडा आणि कच्छ युवक संघ यांनी घेतलेल्या रक्तदान शिबिरात पहिल्यांदा रक्तदान करणाऱ्या श्रुती दवे, माता अवनी बांदेकर आणि कन्या ऐश्वर्या बांदेकर यांच्यासह अनेक युवकयुवतींनी रक्तदान केले. तर स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या मालाडच्या एका परिवारातील चार बहिणींचा खासदार गोपाळ शेट्टी यांनी विशेष सत्कार केला.
या रक्तदानाच्या महायज्ञात महावीर जैन संघ, ब्रह्मकुमारी, वागड समाज, दक्षिण भारतीय, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कच्छ युवक संघ, एमसीएफ, साई प्रबोधन ट्रस्ट, कोळी समाज, गवळी समाज, मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सी मेन्स युनियन आणि गणेश उत्सव मंडळ अशा अनेक संस्थांनी पुढाकार घेतला आहे.
शनिवारी एका दिवसात उत्तर मुंबईत आठ ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरांचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी उद्घाटन आणि पाहणी केली. या वेळी उत्तर मुंबई भाजप अध्यक्ष गणेश खणकर, मुंबई सचिव विनोद शेलार, आमदार मनीषा चौधरी, आमदार योगेश सागर, वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयराज पुरोहित, कोमल छेडा, पोईसर जिमखान्याचे अध्यक्ष मुकेश भंडारी, भाजप नगरसेवक जगदीश ओझा, नगरसेवक जितेंद्र पटेल, नगरसेवक हरीश छेडा, नगरसेवक दीपक तावडे, नगरसेविका प्रतिभा गिरकर तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
-----------------------------------------