धारावीत वेगळाच 'खेला'; जागेचा प्रश्न न सुटल्याने सर्वच उमेदवारांनी भरले फॉर्म

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 12:57 PM2024-10-29T12:57:37+5:302024-10-29T13:21:49+5:30

धारावी विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

Mahayuti and Mahavikas Aghadi parties have filed their nomination separately in Dharavi assembly constituency | धारावीत वेगळाच 'खेला'; जागेचा प्रश्न न सुटल्याने सर्वच उमेदवारांनी भरले फॉर्म

धारावीत वेगळाच 'खेला'; जागेचा प्रश्न न सुटल्याने सर्वच उमेदवारांनी भरले फॉर्म

Dharavi Assembly Constituency : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज करण्याला काही तासच शिल्लक उरले आहेत. मात्र अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा पेच सुटलेला आहे. धारावीतही अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यभरात महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास पूर्ण झालेले असताना धारावी विधानसभा मतदारसंघाचा तिढा सुटलेला नाही. धारावीच्या जागेचा प्रश्न न सुटल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सर्वच इच्छुक उमेदवारांनी आपल्या पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे धारावीत उमेदवारांमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

धारावी विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीमधल्या काँग्रेसने दावा केला होता. सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या वर्षा गायकवाड यांनी विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या काही महिन्यांपासून जोरदार तयारी केली होती. मात्र त्यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास सांगण्यात आले. लोकसभेला त्यांनी भाजपच्या उज्ज्वल निकम यांचा पराभव केला. तर दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात येणाऱ्या धारावीतून ठाकरे गटाचे अनिल देसाई यांना मोठा पाठिंबा मिळाला. त्यामुळे सुरुवातीपासून काँग्रेस आणि ठाकरे गटात या जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरु होती.

धारावीत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांची भगिनी ज्योती गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर आता महाविकास आघाडीमध्ये असलेल्या शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार बाबुराव माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बाबुराव माने यांनी मशाल चिन्हावर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

दोन महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या ज्योती गायकवाड यांना धारावीतून उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षातील नेत्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. ४० वर्षे गायकवाड कुटुंबियांकडे धारावीची सत्ता असल्याने आता इतरांना संधी मिळायला हवी अशी मागणी सुरुवातीपासून ठाकरे गटाच्या आणि आपच्या पदाधिकाऱ्यांची होती. मात्र ज्योती गायकवाड यांना उमेदवारी मिळाल्याने ठाकरे गटाने रोष व्यक्त केला. आता ठाकरे गटाकडून मशाल चिन्हावर माजी आमदार बाबुराव माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेली अनेक वर्षे बाबुराव माने हे धारावी बचाव आंदोलनाच्या माध्यमातून धारावीकरांच्या परिचयात आहेत.

दुसरीकडे महायुतीमध्येही अशीच परिस्थिती आहे. धारावीतही महायुतीमधून उमेदवारी कुणाला मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ही जागा शिवसेनेची असली तरी रिपाईला (आठवले गट) देण्यात असल्याचे म्हटलं होतं. असं असले तरी शिवसेना शिंदे गटाकडून राजेश खंदारे यांनी धनुष्यबाण चिन्हावर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे धारावीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सावळागोंधळ पाहायला मिळत आहे.

त्यामुळे आता धारावीत काँग्रेस, ठाकरे गट, शिंदे गट, रिपाई, आपचे उमेदवार स्वतंत्र लढत असल्याने मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन होणार आहे. त्याचा फटका उमेदवारांना बसणार आहे. मात्र धारावी विधानसभा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होणार की उमेदवारी अर्ज मागे घेतले जाणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
 

Web Title: Mahayuti and Mahavikas Aghadi parties have filed their nomination separately in Dharavi assembly constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.