Join us

मुंबईत महायुती, इतरत्र वेगवेगळे ! पालिका निवडणुका, भाजपची इच्छा; शिंदे गट एकत्र लढण्यास अनुकूल

By यदू जोशी | Updated: February 16, 2025 05:03 IST

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी अमरावती विभागाची आढावा बैठक अकोला येथे अलीकडेच घेतली.

यदु जोशी

मुंबई : मुंबई महापालिकेत भाजप-शिंदेसेना व अजित पवार गट अशी युती होईल; पण, इतरत्र आम्ही वेगवेगळे लढू, अशा पद्धतीनेच आपल्याला तयारी करायची आहे, असे स्पष्ट संकेत भाजपच्या बैठकांमधून सध्या दिले जात असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राज्यभरात महायुती टिकण्याबाबत साशंकता आहे.

New Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वेस्थानकात चेंगराचेंगरी, 3 मुलांसह 15 जणांचा मृत्यू; कुंभमेळ्यात जाण्यासाठी झाली होती गर्दी

 भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी अमरावती विभागाची आढावा बैठक अकोला येथे अलीकडेच घेतली. त्यावेळी बोलताना त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत नक्कीच युती होणार, असे स्पष्ट केले. मात्र, इतरत्रदेखील ती होणारच, असे ठासून सांगितले नाही. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची मुभा असेल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वत्र युती नसेल, असे बोलले जात आहे.

मुंबई महापालिकेत उद्धवसेना-काँग्रेस-शरद पवार गट महाआघाडी झाली तर त्यांना रोखण्यासाठी शिंदेसेना आणि अजित पवार गटाची मदत भाजप घेईल; पण, अन्यत्र एकला ‘चलो रे’ची भूमिका घेतली जाईल, असा बावनकुळे यांच्या विधानाचा अर्थ घेतला जात आहे. महायुती कायम ठेवत मनसेलाही सोबत घेण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत, असे म्हटले जाते.

नेत्यांचे काय म्हणणे?

अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी माध्यमांना सांगितले, की एकटे लढायचे की एकत्र याचा निर्णय तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्रित बसून योग्यवेळी करतील.

शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंत म्हणाले, की महायुतीने एकत्रित लढावे हीच आमचे नेते एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे. स्वबळाची तयारी करा, असे प्रत्येकच पक्षाचे नेते आपापल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी सांगत असतात.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढवू; परंतु जर स्थानिक पातळीवर परिस्थिती वेगळी असेल, तर स्वबळावर लढविण्याचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेऊन प्रदेश भाजपला कळवेल.

चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

महापालिका, जि.प. आधी; नंतर नगरपालिका ?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यावर निकाल आल्यानंतर लगेच या निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल.

मे-जूनमध्ये आधी महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होतील आणि सप्टेंबरमध्ये नगरपालिकांची निवडणूक होईल, असा अंदाज आहे.

अर्थात याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा राज्य निवडणूक आयोगाला असेल; पण, सत्तारूढ भाजपची आधी महापालिका व जि.प. तर नंतर नगरपालिका अशा दोन टप्प्यांमध्ये निवडणूक व्हावी, अशी इच्छा असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बावनकुळेंनी हाती घेतली कार्यकर्ता बळ मोहीम

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सध्या राज्यभरात कार्यकर्ता बळ मोहीम हाती घेतली आहे. प्रत्येक बूथवर दोन जणांची एसईओ म्हणून नियुक्ती केली जाणार आहे.

महामंडळे आणि तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्य पातळीवरील समित्यांवरील नियुक्त्या लवकरात लवकर केल्या जातील, असे ते विविध ठिकाणी आयोजित विभागीय आढावा बैठकांमध्ये सांगत आहेत.

टॅग्स :महायुतीभाजपाशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवारदेवेंद्र फडणवीसएकनाथ शिंदेनिवडणूक 2024