महायुती, महाआघाडीत पहले आप, पहले आप
By सचिन लुंगसे | Published: April 13, 2024 09:08 AM2024-04-13T09:08:43+5:302024-04-13T09:10:44+5:30
विरोधी पक्षाची मते आपल्याकडे कशी वळवली जातील, यासाठी भर दिला जात आहे.
सचिन लुंगसे
मुंबई : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी यांच्याकडून उमेदवारांची घोषणा झालेली नाही. दोन्ही बाजूंनी ‘थांबा आणि वाट पाहा’ असे धोरण स्वीकारण्यात आले आहे. महायुती कोणता उमेदवार देते यावर महाआघाडीचा उमेदवार ठरणार आहे. कोण आधी उमेदवार जाहीर करणार यावर आता लोकांनी शर्यत लावणे सुरु केले आहे. चर्चेत असलेल्या काही नावांनी मात्र मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
भाजपने मतदारसंघात केलेल्या सर्वेक्षणानंतर मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने असेल? यावर खलबते सुरू असून, विरोधी पक्षाची मते आपल्याकडे कशी वळवली जातील, यासाठी भर दिला जात आहे.
ठाकरे गटाची मते मुंबई उत्तरमध्ये लोकसभा मतदारसंघात चमत्कार घडवू शकतात, असे राजकीय जाणकार सांगतात.
ही मते आपल्याकडे वळवता यावी यासाठी भाजपमध्ये प्रयत्न सुरू आहेत. पूनम महाजन यांच्या नावावर नाराजी असली तरी ती कोणावर नसते? असा प्रतिप्रश्न केला जात आहे.
या मतदारसंघात भाजप चौफेर विचार करून उमेदवारी घोषित करेल, असे नेते सांगत आहे.
काँग्रेसचे नेते भाई जगताप, वर्षा गायकवाड ही नावे चर्चेत आहेत. नसीम खान यांचे नाव पुढे येत आहे.
नसीम खान यांनी स्वतः बोलणे टाळले असले तरी ‘मला पक्षाने उमेदवारी दिल्यास मी नक्की निवडणूक लढवील’, असे सांगितले.
‘पक्षाची व लोकांची इच्छा आहे’, असे म्हणत त्यांनी आपले नाव पुढे केले आहे. अद्याप कोणत्याच पक्षाने नावावर शिक्कामोर्तब केले नसल्याने उमेदवारीचा पेच कायम आहे.