विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीची एकत्रित रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 09:54 AM2024-07-09T09:54:33+5:302024-07-09T09:54:49+5:30

मतदानाचा पॅटर्न आमदारांना समजावून सांगणार

Mahayuti Integrated Strategy for Legislative Council Elections | विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीची एकत्रित रणनीती

विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीची एकत्रित रणनीती

मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील पक्षांनी आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती ठरविण्याऐवजी एकत्रित रणनीती आखून मतदानाचा पॅटर्न निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महायुतीचा दोन दिवसांपूर्वी मुंबईत मेळावा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली. तिन्ही पक्षांकडील पहिल्या पसंतीची मते कशी द्यायची, दुसऱ्या पसंतीची मते कशी द्यायची, याबाबत रणनीती ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या २०२२ मधील निवडणुकीत धक्कादायक निकालाची नोंद झाली होती आणि फडणवीस यांनी त्यासाठीची रणनीती ठरवली होती. यावेळी त्याबाबतची मुख्य सूत्रे ही फडणवीस यांच्याकडेच असतील व त्यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाचा पॅटर्न ठरवला जाईल. महायुतीच्या तीन पक्षांची समन्वय समिती आहे, तिच्याकडेही जबाबदारी २ दिली जाईल. भाजप, शिंदेसेना व अजित पवार गटातील असे नेते ज्यांना अशा निवडणुकीतील मतदानाच्या पद्धतीचा अभ्यास आहे, त्यांची मदत रणनीती ठरविण्यासाठी घेतली जाणार आहे. निवडणुकीच्या आधी आमदारांची बैठक घेऊन कोणाला कसे मतदान करायचे आहे, हे सांगितले जाईल.

मतांची जुळवाजुळव सुरू

महायुती ११ पैकी ९ जागा (भाजप ५, शिंदेसेना २ आणि अजित पवार गट लढवत आहे. अपक्ष आणि लहान पक्ष तसेच अन्य मोठ्या पक्षांतील काही मते आपल्याकडे वळवता येतील का? यासाठीची कवायत महायुतीच्या बड्या नेत्यांनी सुरू केली आहे. काँग्रेसच्या तीन ते चार आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. शिंदेसेनेच्या काही आमदारांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न उद्धवसेनेकडून केला जात असल्याची माहिती आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्याने १२ जुलै रोजी निवडणूक
होणार आहे.

Web Title: Mahayuti Integrated Strategy for Legislative Council Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.