मुंबई : शिंदे सेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील असे विधान केले असतानाच शिंदे सेनेत असलेले माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनीही याच आशयाचे वक्तव्य करून महायुतीला घरचा आहेर दिला आहे. राज्यात निवडणुकीत संघर्ष झाला आहेच, पण महाविकास आघाडीने चांगलीच आघाडी घेतली आहे. विरोधकांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे त्याचा महायुतीला नक्कीच फटका बसणार आहे, असे विधान अडसूळ यांनी केले आहे.
मुंबईत मतदानादिवशी शिंदे सेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी मतदान केल्यानंतर मी कुटुंबात एकटा पडलो असून टर्निंग पाँईटला माझ्या मुलासोबत नव्हतो, अशी खंत व्यक्त करत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगल्या जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यांच्या वक्तव्याचे महायुतीमध्ये संतप्त पडसाद उमटले आहेत. भाजप व शिंदे सेनेतून कीर्तिकर यांच्यावर कारवाईची मागणी होऊ लागली आहे. त्यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना अडसूळ यांनी कीर्तिकर यांची पाठराखण केली.
‘कीर्तिकर बोलले ते खरे आहे...’अडसूळ म्हणाले, राज्यात स्पर्धा आहे, हे स्वीकारले पाहिजे. मला पक्षाची बांधिलकी असली तरी चुकीचे बोललो म्हणून खरे ठरणार नाही आणि खरे बोललो म्हणून चुकीचे ठरणार नाही. पण महाविकास आघाडीने राज्यात बऱ्यापैकी आघाडी घेतली आहे, हे मान्य करावेच लागेल. कीर्तिकर जे बोलले तेही खरे आहे. राज्यात व देशात इंडिया व महाविकास आघाडीचे वातावरण आहे. त्याचा महायुतीला नक्कीच फटका बसेल.
‘महाराष्ट्रात कांटे की टक्कर...’संपूर्ण देशात मोदी सरकारबद्दल चांगले वातावरण आहे. उत्तर भारतात ७५ पेक्षा जास्त जागा भाजप जिंकेल. जनतेची चांगली साथ मोदींना आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत, असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. मात्र, महाराष्ट्रात ‘कांटे की टक्कर’ असल्याचेही त्यांनी यावेळी मान्य केले. शुक्रवारी मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधला. आठवले म्हणाले की, येत्या ४ जूनला लोकसभेचा निकाल आहे. त्यात मोदींच्या ‘चारशे पार’च्या नाऱ्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.