उत्तर मुंबईत महायुतीचे महाविकास आघाडीला आव्हान? मनसेमुळे यंदा तिरंगी लढत; भाजपचे प्राबल्य
By मनोहर कुंभेजकर | Published: October 16, 2024 02:42 PM2024-10-16T14:42:23+5:302024-10-16T14:43:12+5:30
मागाठाणे येथून प्रकाश सुर्वे २ वेळा जिंकून आले आहेत. ते आता शिंदेसेनेत आहेत. त्यांच्याविरुद्ध उद्धवसेनेकडून विभागप्रमुख उदेश पाटेकर किंवा उपनेत्या संजना घाडी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी ४२,००० मते घेणारे मनसेचे नयन कदम यांनीही तयारी सुरू केली आहे.
मुंबई : उत्तर मुंबई मतदार संघासाठी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पीयूष गोयल यांनी काँग्रेसच्या भूषण पाटील यांचा ३,५७,६०८ मतांनी पराभव केला होता. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. येथील सहा विधानसभा मतदारसंघांत भाजपचे प्राबल्य असल्याने महाआघाडीला आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.
मालाड पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचे अस्लम शेख २००९ पासून सतत तीनदा विजयी झाले. ३० टक्के अल्पसंख्याक मतदार, कोळी आणि मराठी यांचा हा संमिश्र मतदारसंघ आहे. भाजपकडून मुंबई प्रदेश सचिव विनोद शेलार, मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांची नावे चर्चेत आहेत. लोकसभेत पाटील यांना येथे फक्त ९४३ मतांची आघाडी मिळाल्याने महायुतीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मागाठाणे येथून प्रकाश सुर्वे २ वेळा जिंकून आले आहेत. ते आता शिंदेसेनेत आहेत. त्यांच्याविरुद्ध उद्धवसेनेकडून विभागप्रमुख उदेश पाटेकर किंवा उपनेत्या संजना घाडी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी ४२,००० मते घेणारे मनसेचे नयन कदम यांनीही तयारी सुरू केली आहे.
चारकोपमध्ये अनेक चर्चेत
चारकोपमधून भाजपचे योगेश सागर दोेनवेळा निवडून आले आहेत. येथे उद्धव सेनेचे निरव भार्गव, संतोष राणे तर काँग्रेसमधून कालू बूथेलिया, सुरेश राजहंस, प्रदीप कोठारे ही नावे चर्चेत आहेत. मनसेमधून दिनेश साळवी हे देखील सज्ज झाले आहेत.
कांदिवलीत महायुतीला आत्मविश्वास
आ. अतुल भातखळकर यांच्या कांदिवली मतदारसंघाने लोकसभेत पीयूष गोयल यांना ७० हजार मतांची मोठी आघाडी दिली होती. त्यामुळे ही जागा जिंकणारच, असा आत्मविश्वास महायुतीला आहे. तर, काँग्रेसच्या माजी नगरसेविका डॉ. अजंता यादव आणि यशवंत सिंग यांनी लढण्याची तयारी सुरू केली आहे.
दहिसरमध्ये भाजपचा दावा, बोरीवलीत कॉंग्रेसची चाचपणी
- दहिसर मतदारसंघात भाजपच्या मनीषा चौधरी २०१४ पासून विजयी होत आहेत. मात्र, यावेळी त्यांना उद्धवसेनेचे माजी आ. विनोद घोसाळकर यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे. दुसरीकडे, भाजपच्या प्रसिद्धीप्रमुख नीला राठोड सोनी, माजी नगरसेवक जगदीश ओझा यांनीही दावा सांगितला आहे.
- बोरीवली हा भाजपचा बालेकिल्ला आहे. सुनील राणे हे येथे आमदार आहेत. भाजप सरचिटणीस दिलीप पंडित, महामंत्री शरद साटम हे इच्छुक आहेत. मनसेमधून कुणाल माईणकर यांचे नाव चर्चेत आहे. काँग्रेस सक्षम उमेदवाराची चाचपणी करत आहे.