महायुतीचे वर्चस्व तरीही महाविकास आघाडीचे पारडे जड; दक्षिण मध्य मुंबईत होणार अटीतटीची लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 10:50 AM2024-10-05T10:50:33+5:302024-10-05T10:50:48+5:30

दक्षिण मध्य लोकसभेत माहीम, वडाळा, सायन कोळीवाडा, धारावी, चेंबूर आणि अणुशक्तीनगर अशा सहा विधानसभा येतात.

Mahayuti's dominance still outweighs Mahavikas Aghadi's; The match will be held in South Central Mumbai | महायुतीचे वर्चस्व तरीही महाविकास आघाडीचे पारडे जड; दक्षिण मध्य मुंबईत होणार अटीतटीची लढत

महायुतीचे वर्चस्व तरीही महाविकास आघाडीचे पारडे जड; दक्षिण मध्य मुंबईत होणार अटीतटीची लढत

- महेश पवार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभेपैकी चार मतदारसंघांत महायुतीचे आमदार आहेत. तर, दोन मतदारसंघांत महाविकास आघाडीचे आमदार आहेत. मात्र, असे असतानाही लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे यांचा उद्धवसेनेचे अनिल देसाई यांनी पराभव केला. त्यामुळे येथील सर्व सहा विधानसभांवर आपलाच झेंडा फडकावण्याच्या इराद्याने महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने उतरणार आहे.

दक्षिण मध्य लोकसभेत माहीम, वडाळा, सायन कोळीवाडा, धारावी, चेंबूर आणि अणुशक्तीनगर अशा सहा विधानसभा येतात. यातील वडाळाचे आमदार कालिदास कोळंबकर हे सलग ८ वेळा निवडून आले आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि भाजप असा त्यांचा प्रवास असून पुन्हा ते निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. गेल्यावेळी काँग्रेसचे शिवकुमार लाड यांनी त्यांना चांगली लढत दिली होती. यावेळी त्यांचा सामना उद्धवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्याशी असेल अशी चर्चा आहे.

    दादर-माहीममध्ये शिंदे सेनेचे आ. सदा सरवणकर आणि मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांच्यात थेट लढतीची शक्यता आहे. उद्धवसेनेकडून माजी महापौर विशाखा राऊत, विधान परिषदेतील आ. सचिन अहिर, उपनेते महेश सावंत यांची चर्चा आहे. गेल्या निवडणुकीत मनसेचे संदीप देशपांडे यांनी ४२ हजार मते घेतली होती. मात्र, आता येथील लढत रंगणार आहे.
    सायन कोळीवाडा विधानसभेत भाजप आमदार कॅ. आर तमिळ सेल्वन यांच्या पराभवाचा चंग काँग्रेसने बांधला आहे. खा. गायकवाड हा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. मात्र, उमेदवार कुणीही असला तरी विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी सेल्वन यांनीही कंबर कसली आहे.

    धारावी मतदारसंघाच्या आ. वर्षा गायकवाड लोकसभेत खासदार म्हणून निवडून आल्या. ७६ हजार मते मिळवून त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरणारा हा मतदारसंघ. ही जागा सध्या रिक्त आहे. गेल्या निवडणुकीत उद्धवसेनेचे आशिष मोरे यांना ४२ हजार तर गायकवाड यांना ५३ हजार मते मिळाली होती.
    चेंबूर मतदारसंघात उद्धवसेनेचे प्रकाश फातर्पेकर विद्यमान आमदार आहेत. त्यांच्याविरोधात शिंदे सेनेकडून माजी खा. राहुल शेवाळे यांची चर्चा सुरू आहे. मनसेचे कर्णबाळ दुनबळे हे येथील उमेदवार असण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत फातर्पेकर यांना लढत देणार काँग्रेसचे हंडोरे यांना राज्यसभेवर संधी मिळाली आहे. 
    अणुशक्ती मतदारसंघात माजी मंत्री नवाब मलिक यांचे वर्चस्व आहे. मात्र, त्यांनी अजितदादा यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. समाजवादी पक्षाने या जागेवर दावा सांगितला आहे. तर, शिंदे सेनेचे माजी आ. तुकाराम काते यांनीही दावा सांगितल्याने मलिक की काटे असा पेच महायुतीसमोर आहे.

Web Title: Mahayuti's dominance still outweighs Mahavikas Aghadi's; The match will be held in South Central Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.