अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष प्रतोद महेंद्र दळवी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्याने ते शेकापचे नेते जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर कमालीचे संतप्त झाले आहेत. या दिग्गज नेत्यांना धडा शिकविण्यासाठी दळवी हे शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता आहे.अलिबाग विधानसभेतून निवडणुकीचे तिकीट मिळावे यासाठी दळवी हे सोमवारी दुपारी मातोश्रीवर रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांच्या समवेत प्रशांत मिसाळ, संदीप घरत आणि चंद्रकांत माने असल्याचेही सूत्रांनी सांगितले. दोन दिवसात मेळावा घेऊन ते आपल्या समर्थकांसह कार्यकर्त्यांना कामाला लागा असे आवाहन करण्याची शक्यता आहे.शेकापचे नेते जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राजकीय खेळी करून दळवी यांचा पत्ता कट केला. त्यांनी राष्ट्रवादीचे जि.प. सदस्य सुरेश टोकरे यांना अध्यक्षपदी बसविले. त्यामुळे दळवी यांची स्वप्ने पार धुळीला मिळाली. या आधी शेकापने दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांना अध्यक्षपद देण्याचे कबूल करुन ते दिले नाही. पाटील आणि तटकरे यांनी फसविल्याने दळवी यांच्या मनात चांगलीच खदखद आहे.अलिबाग विधानसभेसाठी शिवसेनेला अद्यापही ताकदवान उमेदवार सापडलेला नाही. दळवी यांच्या रुपाने तो मिळाला तर, शिवसेनेला ते हवेच आहे. दळवी यांनी शिवसेनेत प्रवेश करावा यासाठी जिल्ह्यातील काही नेते सुरुवातीपासूनच सक्रिय होते. रविवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या १४ सदस्यांनी त्यांना मतदानही केले होते. त्यामुळे दळवी यांचा शिवसेनेतील प्रवेश सुकर होऊ शकतो.
महेंद्र दळवी शिवसेनेचे धनुष्यबाण उचलणार!
By admin | Published: September 23, 2014 1:53 AM