Join us

महेंद्रसिंग धोनी ठरणार का अव्वल यष्टिरक्षक?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 3:56 AM

दिग्गज महेंद्रसिंग धोनी आपल्या कारकिर्दीतील अखेरची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खेळणार असल्याचे मानले जात आहे.

मुंबई : दिग्गज महेंद्रसिंग धोनी आपल्या कारकिर्दीतील अखेरची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खेळणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळेच यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत त्याच्यावरच सर्वांच्या नजरा खिळतील यात शंका नाही. सामन्यात कितीची दबावाची स्थिती असली, तरी कायम शांत डोक्याने खेळणाऱ्या धोनीने आपल्या ‘कूल’ नेतृत्वाखाली भारतीय संघाला २०११ साली विश्वविजयी केले होते. यंदा संघातील सर्वांत अनुभवी खेळाडू म्हणून स्पर्धेत सहभागी होणारा धोनी आपली छाप पाडण्यास उत्सुक असेल. या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेचा दिग्गज यष्टिरक्षक कुमार संगाकाराचा विश्वविक्रम मोडण्याची नामी संधी धोनीकडे आहे.संगाकारा विश्वचषक स्पर्धेतील सर्वांत यशस्वी यष्टिरक्षक आहे. त्याने २००३ ते २०१५ दरम्यान चार विश्वचषक स्पर्धा खेळताना ३७ सामन्यांतून ५४ बळी मिळवताना ४१ झेल व १३ यष्टिचित केले आहेत. आॅस्टेÑलियाचा माजी यष्टिरक्षक अ‍ॅडम गिलख्रिस्ट याने तीन विश्वचषक स्पर्धा खेळताना ३१ सामन्यांतून ५२ बळी घेतले आहेत. गिलख्रिस्टने ४५ झेल घेताना ७ यष्टिचित केले आहेत. यानंतर ३७ वर्षीय माहीने ३२ बळींसह तिसरे स्थान मिळवले आहे. अव्वल स्थानी असलेल्या संगाकाराला मागे टाकण्यासाठी धोनीला आता इंग्लंडमध्ये किमान २३ बळी मिळवावे लागतील. स्पर्धेत भारतीय संघ कमीतकमी ९ आणि जास्तीतजास्त ११ सामने खेळेल. धोनीने २००७, २०११ आणि २०१५ साली विश्वचषक स्पर्धेत खेळताना एकूण २० सामन्यांत ३२ बळी घेतले आहेत. यामध्ये २७ झेल आणि ५ यष्टिचितचा समावेश आहे. न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्क्युलमनेही ३२ बळी घेतले आहेत, मात्र यासाठी त्याने ३४ सामने खेळले.धोनीकडे विश्वचषक इतिहासातील सर्वांत यशस्वी यष्टिरक्षक बनण्याची संधी असतानाच स्पर्धेच्या एकाच सत्रात सर्वाधिक बळी घेण्याचा विश्वविक्रम नोंदविण्याचीही संधी आहे.दोन्ही विक्रम करण्यात त्याला यश मिळाले, तर यंदाचा विश्वचषक धोनीसाठी डबल धमाका ठरेल. विश्वचषक स्पर्धेच्या एकाच सत्रामध्ये सर्वाधिक बळी मिळविण्याचा विक्रम आॅस्टेÑलियाच्या अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या नावावर आहे.त्याने २००३ साली झालेल्या स्पर्धेत १० सामन्यांतून २१बळी मिळविले होते. धोनीने २०१५ साली आपली सर्वोत्तम कामगिरी करताना ८ सामन्यांतून १५ बळी मिळविले होते.>विश्वचषकातील यशस्वी यष्टिरक्षक१. कुमार संगाकारा (श्रीलंका) : ३७ सामने ५४ बळी.२. अ‍ॅडम गिलख्रिस्ट (आॅस्टेÑलिया) : ३१ सामने ५२ बळी.३. महेंद्रसिंग धोनी (भारत) : २० सामने ३२ बळी.४. ब्रेंडन मॅक्क्युलम (न्यूझीलंड) : ३४ सामने ३२ बळी.५. मार्क बाऊचर (दक्षिण आफ्रिका) : २५ सामने ३१ बळी.>विश्वचषकाच्याएका सत्रातील यशस्वी यष्टिरक्षक१. अ‍ॅडम गिलख्रिस्ट (आॅस्टेÑलिया, २००३) : १० सामने २१ बळी.२. कुमार संगाकारा (श्रीलंका, २००३) : १० सामने १७ बळी.३. अ‍ॅडम गिलख्रिस्ट (२००७) : ११ सामने १७ बळी.४. फिलिप डुजोन (वेस्ट इंडिज, १९८३) : ८ सामने १६ बळी.५. ब्रॅड हॅडिन (आॅस्टेÑलिया, २०१५) : ८ सामने १६ बळी.६. मोइन खान (पाकिस्तान, १९९९) : १० सामने १६ बळी.७. राहुल द्रविड (भारत, २००३) : ११ सामने १६ बळी.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनी