मंगळसूत्र विकून गाठले माहेर
By Admin | Published: March 23, 2015 12:26 AM2015-03-23T00:26:34+5:302015-03-23T00:26:34+5:30
महाराष्ट्र पुरोगामी असे आपण म्हणवून घेत असलो तरीदेखील अजूनही राज्यात स्त्रियांवरचे अत्याचार, अनिष्ट रूढी-परंपरा समूळ नष्ट झालेल्या नाहीत, हे वास्तव आहे.
मनीषा म्हात्रे - मुंबई
महाराष्ट्र पुरोगामी असे आपण म्हणवून घेत असलो तरीदेखील अजूनही राज्यात स्त्रियांवरचे अत्याचार, अनिष्ट रूढी-परंपरा समूळ नष्ट झालेल्या नाहीत, हे वास्तव आहे. महिलांवरील अत्याचार सुरूच असल्याचे विक्रोळीच्या महात्मा फुले रुग्णालयात उपचार घेणारी श्रावणी आंबेकरकडे पाहून समोर येत आहे. सध्या श्रावणीचा मृत्यूशी संघर्ष सुरू
आहे.
पाच वर्षांपूर्वी घरातून पाठवणी केलेल्या पोटच्या मुलीवर आत्महत्येची वेळ येईल, असे राजापकर कुटुंबीयांना स्वप्नातही वाटले नसेल. आपल्या मुलीला आयुष्याभर सोबत देणारा तिचा पती क्रूर असेल, याची कल्पनाही त्यांना नव्हती. आयटी इंडस्ट्रीत कामाला असल्याने राजापकर कुटुंबीयांनी श्रावणीचे लग्न संतोष आंबेकरशी लावून दिले.
काही वर्षांनी आंबेकर कुटुंबीय बंगळुरूला स्थायिक झाले. परंतु भाड्याच्या घरात राहवे लागत असल्याने संतोष आणि त्याच्या आईने श्रावणीजवळ माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावला. त्यानुसार माहेरच्या मंडळींनी पाच लाख आणि एक टीव्हीदेखील पाठविला. परंतु सासरच्या मंडळींच्या वाढत्या मागण्या पाहून श्रावणीने विरोध केल्यावर त्यासाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरुवात केली.
क्रौर्याची परिसीमा म्हणजे श्रावणीला तिच्या सासूने इतकी मारहाण केली, की अजूनही श्रावणीच्या अंगावर जागोजागी चावल्याच्या आणि मारहाणीच्या खुणा आहेत. माहेरहून पैसे मिळायचे बंद झाल्यावर पाच वर्षांच्या मुलीला नंदेकडे पाठवून आंबेकर कुटुंबीयांनी श्रावणीला घराबाहेर काढले. शेवटी आपले मंगळसूत्र विकून मिळालेल्या पैशातून तिने घरच्यांशी संपर्क साधला. ती बंगळुरू एअरपोर्टला पोहोचली, मात्र श्रावणीची अवस्था पाहून तेथील कर्मचाऱ्यांनी तिला हटकले. ही माहिती तिच्या कुटुंबीयाना मिळताच तिच्या भावाने बंगळुरू एअरपोर्टकडे धाव घेतली.
श्रावणीला घेऊन त्या भावाने बंगळुरूमधील स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर महिला पोलीस उपलब्ध नसल्याचे कारण सांगून तक्रार घेण्यास पोलिसांनी नकार दिला. अखेर निराश होत भावासोबत ती मुंबईत दाखल झाली. सध्या श्रावणीवर विक्रोळीच्या महात्मा फुले रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजापकर कुटुंबीयांना सासरच्या जाचातून आपल्या मुलीला सोडवता आले; पण आपल्या मुलीची अशी अवस्था करणाऱ्यांना कडक शासन व्हायला हवे, अशी अपेक्षा तिचे वडील नरेंद्र राजापकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा नोंद करून आरोपींना अटक करण्यासाठी बंगळुरूला पथक पाठविले आहे. परंतु या घटनेमुळे हुंड्याची परंपरा अजूनही मूळ धरून आहे, हे सिद्ध होत आहे़
च्आजही मुंबईसारख्या शहरात श्रावणीसारख्या अनेक महिला हुंड्यासाठी बळी पडत आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या या वर्षीच्या पहिल्या तीन महिन्यांंच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी केलेल्या मानसिक आणि शारीरिक छळांप्रकरणी १०३ गुन्हे दाखल असून, त्यामध्ये एकीची हत्या करण्यात आली, तर एकीचा बळी गेला.
च्सासरच्या जाचाला कंटाळून ८ महिलांनी आत्महत्या केली. पैकी अवघ्या २३ गुन्ह्यांत आरोपींना शिक्षा झाली आहे. दुसरीकडे गेल्या वर्षी १२५ गुन्ह्यांंची नोंद होऊन ५ विवाहितांचे बळी गेले, तर ७ जणींनी आत्महत्या केली. यापैकी ५७ गुन्ह्यांंची उकल झाली आहे. मुंबई पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हुंडाबळीच्या गुन्ह्यांमध्ये तक्रारदार महिलेच्या तक्रारीला प्राधान्य देत तिचे समुपदेशन करण्यात येते. त्यात तथ्य आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येतो. पैकी कमी प्रमाणात तक्रारी
खोट्या निघतात.
महिलांनी पुढे यावे...
हुंड्यासाठी महिलांवर अत्याचार होत असेल तर महिलांनी याविरोधात आवाज उठवत पोलिसांकडे यावे. महिलेला योग्य न्याय देत आरोपींना कडक शासन करण्यात येईल, असे आव्हान पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.