मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्युप्रकरणाची पोलिसांकडून तपास सुरू बॉलिवूडमधील अनेकांची चौकशी पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी लावून धरली असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामींच्या या संदर्भातील पत्राची दखल घेतल्याचे समजते. तर, आता याप्रकरणी दिग्दर्श करण जोहर आणि महेश भट्ट यांचीही चौकशी होईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
सुशांतच्या आत्महत्येला आता 1 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे, दरम्यानच्या काळात पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यातच, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एएनआयशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. याप्रकरणी दिग्दर्शक महेश भट्ट यांचा जबाब नोंद करण्यात येईल. तर, करण जोहरच्या मॅनेजरचीही चौकशी करण्यात येईल. गरज पडल्यास करण जोहरला पोलिसांकडून बोलविण्यात येईल, असे देशमुख यांनी सांगितले.
सुशांतच्या मृत्यूनंतर महेश भट्ट आणि करण जोहर यांना सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. त्यामुळे, गृहमंत्र्यांनी दिलेल्या या माहितीमुळे तपासाला गती येणार असल्याचे दिसते. यापूर्वीही मुंबई पोलिसांनी रिया चक्रवर्ती, आदित्य चोपडा, संजय लीला भन्साळी यांची चौकशी केली आहे.
दरम्यान, सुशांतच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी विनंती स्वामींनी मोदींना एका पत्राद्वारे केली होती. मोदींनी स्वामींच्या या पत्राची दखल घेतल्याने आता सुशांत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची शक्यता वाढली आहे. स्वामींचे सहकारी व वकील इशकरण सिंह भंडारी यांनी यासंदर्भात दोन ट्विट केलेत. सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी करणारे पत्र स्वामींनी पीएम मोदींना लिहिले होते. मोदींनी या पत्राची दखल घेतली आहे, अशी माहिती भंडारींनी टि्वटमध्ये दिली आहे.
दरम्यान, टीव्ही ते बॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूतने मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. सुशांत आज आपल्यात नाही, आता तो कधीच परतायचा नाही. मात्र, सुशांतच्या मृत्यूनंतर गेल्या शुक्रवारी त्याचा अखेरचा सिनेमा ‘दिल बेचारा’ रिलीज झाला आणि त्याचा हा सिनेमा पाहून चाहत्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. डिस्री प्लस हॉटस्टारवर ‘दिल बेचारा’ रिलीज झाला आणि रिलीज होताच चाहत्यांच्या या सिनेमावर अक्षरश: उड्या पडल्यात. इतक्या की, सिनेमा रिलीज झाल्यानंतर काही तासांतच हॉटस्टार क्रॅश झाले होते.