Join us

महेश भट्ट साधणार संवाद

By admin | Published: January 13, 2016 2:14 AM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि पुणे फिल्म फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक महेश

मुंबई : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि पुणे फिल्म फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. या वेळी महेश भट्ट उपस्थित प्रेक्षकांसोबत स्मिता पाटील यांनी विविध चित्रपटांत साकारलेल्या भूमिकांवर सुमारे तासभर संवाद साधणार आहेत, अशी माहिती महोत्सवाचे संचालक आणि ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.पटेल म्हणाले की, यंदा प्रथमच दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील हिच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘स्मिता पाटील स्मृती’ व्याख्यानाचे आयोजन केले आहे. या व्याख्यानात महेश भट्ट मार्गदर्शन करतील. मास्टर लेक्चरअंतर्गत चित्रपटांच्या तांत्रिक अंगांची माहितीही या वेळी दिली जाईल; तसेच प्रेक्षकांच्या प्रतिक्रियादेखील नोंदविल्या जाणार आहेत. २२ ते २८ जानेवारीदरम्यान पार पडणाऱ्या या महोत्सवात वहिदा रेहमान यांच्यासोबत अर्जेंटिनाचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक पाब्लो सिझर यांची प्रमुख उपस्थिती असेल. महोत्सवाची सुरुवात ‘ला बुका’ या डॅनियल सिपरी दिग्दर्शित इटालियन चित्रपटाने होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवार, २२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. महोत्सवामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना चित्रसृष्टीत दिलेल्या योगदानाबद्दल पवार यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.