महेश गायकवाड व्हेंटीलेटरवर तर आ. गायकवाड यांचे अद्याप निलंबन नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 08:52 AM2024-02-04T08:52:23+5:302024-02-04T08:53:00+5:30
गायकवाड यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) नेत्यावर केलेल्या गोळीबारानंतर भाजप आणि शिवसेनेत ताणतणाव होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांना केलेल्या कथित गोळीबारानंतरही त्यांना प्रदेश भाजपने पक्षातून अद्याप निलंबित केलेले नाही. मात्र, त्यांच्यावर लवकरच निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गायकवाड यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) नेत्यावर केलेल्या गोळीबारानंतर भाजप आणि शिवसेनेत ताणतणाव होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आ. गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काही आरोप केल्याने शिवसेनेत अस्वस्थता आहे. या आरोपांबाबत भाजपचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात ते आधी पाहू आणि नंतरच आम्ही काय ते बोलू, असे शिवसेनेच्या एका नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले. आ. गायकवाड यांना भाजपने निलंबित केले तरी आमदार म्हणून त्यांचे अधिकार अबाधित राहतील. त्यांना शिक्षा होत नाही तोवर त्यांची आमदारकीही राहील. राज्यसभेच्या सहा जागांसाठी २७ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत मतदानाचा अधिकार आ. गायकवाड यांना असेल.
सहा गोळ्या लागलेले महेश गायकवाड व्हेंटिलेटरवर
ठाणे : शिवसेनेचे (शिंदे गट) कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांना एकूण सहा गोळ्या लागल्या असून, त्यातील तीन गोळ्या पाठीमागील बाजूस उजव्या खांद्याच्याजवळ, एक गोळी छातीलगत, एक जांगेत आणि एक मणक्याला लागली आहे. महेश गायकवाड हे व्हेंटिलेटरवर असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. राहुल पाटील यांना दोन दिवस आयसीयूमध्ये ठेवले जाणार असल्याचेही रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
खा. श्रीकांत शिंदे यांचे कार्यक्रम रद्द
डोंबिवली : कल्याण पूर्व येथील गोळीबाराच्या घटनेनंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे शनिवारी सावित्रीबाई फुले नाट्यगृहात ‘अविश्रांत श्रीकांत’ या विषयावर होणारी प्रकट मुलाखत, तसेच ‘तालसंग्राम पर्व ४’ या राज्यस्तरीय ढोल-ताशा स्पर्धेला उद्घाटक म्हणून उपस्थिती आदी कार्यक्रम रद्द केले आहेत. तशी माहिती खासदार शिंदे आणि कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते, संबंधित संस्था प्रतिनिधींना दिली.
भाजपचे माजी आमदार पवारांना भेटू दिले नाही
हिललाइन पोलिस ठाण्यात आ. गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना एका बंदिस्त खोलीत सुरक्षित ठेवण्यात आले असताना त्यांना भेटण्यासाठी आलेल्या भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांना भेटीविना माघारी फिरावे लागले. पवार हे तीन तास पोलिस ठाण्यात थांबूनही भेटू शकले नाहीत. नरेंद्र पवार हे समर्थकासह आ. गायकवाड यांना भेटण्यासाठी पहाटे ४ वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात थांबले. मात्र, त्यांना पोलिसांनी भेटू दिले नाही. पहाटे ५ वाजता आ. गायकवाड यांना कळवा पोलिस ठाण्यात हलविताना पत्रकारांनी त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पोलिसांनी बोलू दिले नाही.