Join us

महेश कोठारे वेगळ्या धाटणीच्या सिनेमांचे जनक; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 5:59 AM

दादर येथील श्री शिवाजी मंदिरमध्ये मराठी सिनेसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत महेश कोठारे यांच्या ‘डॅम इट आणि बरंच काही’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

मुंबई : महेश कोठारे, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांच्यामुळे मराठी सिनेमाचा लळा लागला. मराठी सिनेमाचा कायापालट करून नव्या पिढीला जोडण्याचे काम महेश कोठारेंनी केले. ते मराठीतील वेगळ्या धाटणीच्या सिनेमांचे जनक आहेत. कोठारे यांचे मनोरंजन विश्वातील योगदान अतुलनीय आहे, असे कौतुकोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे काढले. निमित्त होते अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश कोठारे यांच्या ‘डॅम इट आणि बरंच काही’ पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे. 

दादर येथील श्री शिवाजी मंदिरमध्ये मराठी सिनेसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत महेश कोठारे यांच्या ‘डॅम इट आणि बरंच काही’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. फडणवीस यांनी रिमोटचे बटण दाबून पुस्तकाचे प्रकाशन केले. उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कोठारेंनी व्यावसायिकतेला खूप महत्त्व दिले. नवीन लोकांसोबत काम करताना जुने संबंध कायम राखले. यशाचे शिखर गाठताना अपयशही पाहिले. त्यांचे सुंदर चरित्र लिहिण्यात आले आहे. ‘डॅम इट’चा जन्म कसा झाला हेदेखील यात आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिनाथ कोठारे, उर्मिला कोठारे व रोहित हळदीकर यांनी केले.

महेश कोठारे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित अभिनेता आदिनाथ कोठारे, अभिनेत्री उर्मिला कोठारे, पुस्तकाचे संपादक मंदार जोशी, बँक ऑफ महाराष्ट्रचे आशिष पांडे आणि मेहता पब्लिशिंग हाऊसचे अखिल मेहता. प्रकाशन सोहळ्याला किरण शांताराम, ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, निवेदिता सराफ, मच्छिंद्र चाटे, जयवंत वाडकर, रामदास पाध्ये, उमेश जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.  

महेश कोठारे म्हणाले...

पुस्तकात माझे जीवन मांडले आहे. अनेक चढ-उतारही आहेत. अनेकजण पाठीशी उभे राहिले म्हणून मी उभा राहू शकलो. माझ्या जीवनातील कटू-गोड आठवणींचे हे पुस्तक पुढील पिढीला प्रेरणा देणारे ठरेल.

सचिन पिळगावकर म्हणाले...

समोर स्पर्धा करणारी व्यक्ती नसेल तर स्पर्धा होऊ शकत नाही. स्वतःची वेगळी शैली असलेल्या प्रतिस्पर्ध्याबद्दलही आपुलकी असते. लोकांना आम्ही प्रतिस्पर्धी असल्याचा आनंद मिळायचा आणि आम्हा दोघांना आमचे सिनेमे सिल्व्हर-गोल्डन ज्युबिली व्हायचा आनंद मिळायचा.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमहेश कोठारे