स्थायी समितीवरही महिलाराज
By admin | Published: May 27, 2015 12:43 AM2015-05-27T00:43:47+5:302015-05-27T00:43:47+5:30
दोन दशकांपासून स्थायी समितीवर असलेले पुरुषांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षांनी महिलांना उमेदवारी दिली आहे.
नवी मुंबई : दोन दशकांपासून स्थायी समितीवर असलेले पुरुषांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षांनी महिलांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्रा शिर्के यांना पहिल्या महिला सभापती होण्याचा मान मिळणार असल्याचे स्पष्ट झाले असून, अधिकृत निवड बुधवारी होणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये २० वर्षांमध्ये १७४ महिलांना नगरसेविका होण्याचा बहुमान मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये १११ पैकी ६२ महिला निवडून आल्या आहेत. आतापर्यंत चार महिलांना महापौर म्हणून संधी मिळाली आहे. उपमहापौर पदापासून महत्त्वाची सर्व पदे महिलांनी भूषविली आहेत. परंतु महापालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतीपदावर मात्र अद्याप महिलांना संधी देण्यात आली नव्हती. आर्थिक उलाढाल असल्यामुळे महिलांना या पदावर नियुक्त केले जात नसल्याची चर्चा होती. नवी मुंबईच नव्हे तर मुंबई व इतर महापालिकांमध्येही स्थायी समितीचे सभापतीपद सहसा महिलांकडे दिले जात नाही. परंतु यावेळी नवी मुंबई महापालिकेत या पदावरील पुरुषांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसने तिसऱ्यांदा निवडून आलेल्या नेत्रा शिर्के यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने कोमल वास्कर यांना उमेदवारी दिली आहे.
स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसचे ८, काँगे्रसचा १, शिवसेनेचे ६ व भाजपाचा १ सदस्य आहे. आघाडीकडे ९ सदस्य असल्यामुळे त्यांचाच सभापती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु शिवसेनेने पुन्हा चमत्कार करण्याची घोषणा केली आहे. काँगे्रसला आपल्या बाजूला वळवून दोन्ही बाजूला समान मते करण्याची व्यूव्हरचना आखली आहे. तसे झाल्यास लॉटरीद्वारे पदनिश्चिती केली जाऊ शकते. परंतु महापौर निवडणुकीमध्येही शिवसेनेने अशीच चमत्कार होण्याची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात काहीच झाले नाही. त्याचप्रमाणे यावेळीही होईल व नेत्रा शिर्के या पहिल्या महिला सभापती होतील, असे मत व्यक्त केले जात आहे. बुधवारी दुपारी १२ वाजता महापालिकेत सभापतीपदासाठी निवडणूक होणार आहे. (प्रतिनिधी)
लोकमतच्या पाठपुराव्याला यश
महापालिकेची स्थापना झाल्यापासून २० वर्षांत स्थायी समितीचे सभापतीपद एकदाही महिलांना देण्यात आले नाही. ‘लोकमत’ने याविषयी सातत्याने आवाज उठविला होता. महिलांना जाणीवपूर्वक या पदापासून दूर ठेवले जात आहे. त्यांच्या निर्णयक्षमतेवर व कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. पहिल्यांदा महिलेस या पदावर संधी दिली जात असून ‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश आले आहे.
धाडसी निर्णयाची हॅट्ट्रिक
राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी नगरसेविकेला सभापतीपदाची उमेदवारी देऊन धाडसी निर्णयांची हॅट्ट्रिक केली आहे. यावेळी नाईक परिवारातील कोणालाही उमेदवारी दिली नाही. यानंतर महापौर पदावर अपक्ष नगरसेवकाची वर्णी लावून सर्वांना धक्का दिला होता. स्थायी समिती सभापतीपदासाठी पहिल्यांदा नगरसेविकेला संधी दिली आहे.