Join us  

पोलीस ठाण्यात महिलाराज

By admin | Published: March 09, 2016 3:51 AM

महिला दिनाच्या निमित्त्ताने शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार वाशी, सानपाडा पोलीस ठाण्याचे संपूर्ण कामकाज महिला अधिकाऱ्यांनी हाताळले

नवी मुंबई : महिला दिनाच्या निमित्त्ताने शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार वाशी, सानपाडा पोलीस ठाण्याचे संपूर्ण कामकाज महिला अधिकाऱ्यांनी हाताळले, तर सीबीडी पोलीस ठाण्यात परिसरातील महिलांना कायदा व सुव्यस्थेबाबत मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मंगळवारी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस खात्यातील महिलांना सन्मानाची वागणूक देणारे उपक्रम राबवले गेले. सध्या सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत असल्या, तरीही काही महत्त्वाच्या कामांची जबाबदारी ही पुरुषांच्याच खांद्यावर असते. पोलीस खात्यातही काही प्रमाणात तसेच चित्र आहे. अगदी मोजक्याच महिला अधिकाऱ्यांना वरिष्ठ पदावर स्थान मिळाले असून गंभीर गुन्ह्यांच्या तपासासारखी महत्त्वाची जबाबदारीही काहीच महिला अधिकाऱ्यांवर सोपवली जाते. यामुळे किमान महिला दिनी तरी महिला अधिकारी व कर्मचारी यांना पोलीस ठाण्यात अधिकार गाजवता यावा यावर नवी मुंबई पोलिसांनी भर दिला. त्यानुसार वाशी व सानपाडा पोलीस ठाण्यातील संपूर्ण कामकाज महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सोपवले होते. ठाणे अंमलदारपासून ते तपास अधिकाऱ्यापर्यंतची भूमिका उपस्थित महिला पोलिसांनी पार पाडली. वाशीचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे व सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आनंदा होडगे यांच्यावतीने हा उपक्रम राबवला गेला. त्याशिवाय सानपाडा पोलिसांनी वात्सल्या ट्रस्टमधील अनाथ मुलींसोबत महिला दिन साजरा केला. यावेळी त्यांच्या समस्या जाणून घेवून पालक या नात्याने पोलीस त्यांच्या पाठीशी असल्याची जाणीव करून दिली. तर वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी महिलांसाठी कायदेविषयक शिबिर राबविले.