माहीमच्या प्राचीन शीतळादेवी मंदिराचा लवकरच जीर्णोध्दार, गोव्याच्या धर्तीवर भव्य मंदिर संकुल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 05:03 PM2023-10-20T17:03:07+5:302023-10-20T17:03:45+5:30

अडीचशे वर्षापूर्वीचा प्राचीन इतिहास आणि जुन्या देवालयाचा उत्तम दस्तावेज असलेल्या माहीम येथील प्राचीन शीतळादेवी मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात येणार आहे.

Mahim ancient Sheetala Devi temple soon to be renovated a grand temple complex on the lines of Goa | माहीमच्या प्राचीन शीतळादेवी मंदिराचा लवकरच जीर्णोध्दार, गोव्याच्या धर्तीवर भव्य मंदिर संकुल

माहीमच्या प्राचीन शीतळादेवी मंदिराचा लवकरच जीर्णोध्दार, गोव्याच्या धर्तीवर भव्य मंदिर संकुल

मुंबई

अडीचशे वर्षापूर्वीचा प्राचीन इतिहास आणि जुन्या देवालयाचा उत्तम दस्तावेज असलेल्या माहीम येथील प्राचीन शीतळादेवी मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात येणार आहे. गोव्यातील मंदिरांच्या धर्तीवर शीतळादेवीचे भव्य मंदिर संकुल निर्मितीचा मानस मंदिर ट्रस्ट कार्यकारिणीचा आहे. त्याला सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाल्याने शीतळादेवी मंदिराच्या जीर्णोध्दाराचा मार्ग मोकळा झाला आहे. 

गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट ही संस्था अनेक वर्षांपासून या मंदिराचा कारभार सांभाळत आहे. संस्थेतर्फे बरीच समाजोपयोगी कामे केली जातात. गरजू मुलांना शिक्षणाचे साहित्य पुरवले जाते. आवश्यक कुटुंबांना वैद्यकीय उपचारांसाठी सहकार्य केले जाते. त्याचप्रमाणे येथील दीड एकर देवालय परिसराचा पुनर्विकास करण्याचे काम गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्टने हाती घेतले आहे. 

शीतळादेवी परिसराचा पुनर्विकास करणे आवश्यक आहे. त्यानुसार परिसरातील देवालये आणि वास्तूचा पुनर्विकास केला जाणार आहे. शीतळादेवी मंदिराच्या जीर्णोध्दाराला सर्वसाधारण सभेची मान्यता आहे. मंदिर प्राचीन असून त्यासंदर्भात पुरातत्व खात्याकडे पत्रव्यवहार सुरू आहे. त्याचे उत्तर लवकर आल्यास नवरात्रीनंतर जार्णोध्दार प्रक्रियेला अधिक वेग येईल. 
- शशांक एम.गुलगुले, अध्यक्ष, विश्वस्त.

कोळी बांधवांचे कुलदैवत
सर्वसाधारण सभेत जीर्णोध्दारासाठी मान्यता मिळाली आहे. तसेच संबंधित विभागाचा पत्रव्यवहार पूर्ण झालेला आहे. त्यामुळे विकासासाठी आवश्यक प्रक्रिया लवकरच पूर्ण होत असल्याचे विश्वस्त अवधूत दाभोळकर यांनी सांगितले. दादर, माहीम कोळी बांधवांचे कुलदैवत म्हणून शीतळादेवीचे माहीम येथील मंदिर प्रसिद्ध आहे. 

- हे मंदिर अडीचशे वर्षांपूर्वीचे आहे. या मंदिराच्या परिसरात मारुती, खोकलादेवी, कालिकामाता, भगवान शंकर, गणपती, स्वामी समर्थ, शांतादुर्गा देवी आणि विठ्ठल रुक्माई या देव-देवतांची मंदिरे आहेत. मंदिर परिसरात पुरातन विहीर आहे. 

- लोकल याठिकाणी स्नानासाठी येत असतात. त्या विहिरीतील पाण्याने आंघोळ केली की त्वचेसंबंधी उद्भवणारे आजार नाहीसे होतात. मंदिराच्या आवारात खोकला देवीच्या कृपा प्रसादामुळे खोकल्याचे रुग्ण बरे होतात, अशी श्रद्धा आहे. 

Web Title: Mahim ancient Sheetala Devi temple soon to be renovated a grand temple complex on the lines of Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई