Join us

उमेदवारी मागे न घेतल्याने सरवणकरांचे आव्हान कायम; अमित ठाकरे म्हणाले, "ते समोर नसते तरी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 5:23 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भेट नाकारल्यानंतर सदा सरवणकर यांनी निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचे जाहीर केले आहे.

Mahim Assembly Constituency : माहीम विधानसभा निवडणुकीकडे आता राज्याचे लक्ष लागलं आहे. या मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे अमित ठाकरेंची लढत शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे महेश सावंत यांच्यासोबत होणार आहे. अमित ठाकरेंना निवडून आणण्यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत होते. महायुतीच्या नेत्यांनी सदा सरवणकर यांना माघार घेण्यास सांगितले होते. मात्र सरवणकर हे निवडणूक लढणवण्यावर ठाम आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दिवशी सरवणकरांनी निवडणूक लढवण्याची भूमिका कायम ठेवली. त्यानंतर आता अमित ठाकरेंनी याबाबत भाष्य केलं आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सदा सरवणकर हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेटण्यास गेले होते. मात्र राज ठाकरेंनी भेट नाकारल्याने सदा सरवणकर यांनी माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. भेटीनंतर राज ठाकरे जो आदेश देतील तो पाळणार होतो. तसेच राज ठाकरेंची भेट घेण्याचा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता, असेही सरवणकर यांनी म्हटलं होतं. मात्र आता सरवणकरांनी उमेदावारी मागे न घेतल्यानंतर अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याने याकडे तुम्ही कसे पाहता असा सवाल अमित ठाकरेंना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना अमित ठाकरे यांनी मला अजिबात आव्हान वाटत नाही म्हटलं. "ते समोर असते-नसते, तरी मी निवडणूक माझ्या पद्धतीनेच लढवली असती. मी लोकांमध्ये गेलोच असतो. मी प्रामाणिकपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. मला मतदान करायचं की नाही हे लोकांच्या हातात आहे. पण जिंकणार की नाही, हे देवाच्या हातात आहे. त्यामुळे मला अजिबात आव्हान वाटत नाही," असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी काही तास शिल्लक असताना सदा सरवणकर हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. सरवणकर यांनी मुलगा समाधान सरवणकर यांना राज ठाकरेंकडे पाठवलं. त्यावेळी राज ठाकरे यांना सरवणकर यांना भेटायचे आहे, असा निरोप देण्यात आला. मात्र राज ठाकरे यांनी सरवणकर यांना भेटण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर सरवणकर यांनी निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केलं.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबई विधानसभा निवडणूकमाहीमअमित ठाकरेसदा सरवणकर