"अचानक घरगडी आणून..."; काँग्रेसमध्ये गेले म्हणणाऱ्या राज ठाकरेंना सरवणकारंचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 04:11 PM2024-11-11T16:11:25+5:302024-11-11T16:17:59+5:30

Mahim Assembly constituency : अमित ठाकरेंच्या सभेत राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर सदा सरवणकर यांनी भाष्य केलं आहे.

Mahim Assembly constituency I look at him with respect Sada Saravankar reply to Raj Thackeray criticism | "अचानक घरगडी आणून..."; काँग्रेसमध्ये गेले म्हणणाऱ्या राज ठाकरेंना सरवणकारंचे प्रत्युत्तर

"अचानक घरगडी आणून..."; काँग्रेसमध्ये गेले म्हणणाऱ्या राज ठाकरेंना सरवणकारंचे प्रत्युत्तर

Sada Sarvankar on Raj Thackeray : माहीम विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी प्रभादेवी अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. या सभेदरम्यान, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह सदा सरवणकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. जो कोणाचाच नाही झाला, त्याबद्दल आपण काय बोलायचं? असं म्हणत राज ठाकरेंनी सरवणकरांना टोला लगावला. व्यक्ती म्हणून यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही, असेही राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर सदा सरवणकर यांनी भाष्य केलं आहे.

माहीम विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत. तर मनसेचे अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अमित ठाकरेंना ही निवडणूक सोपी जावी म्हणून सुरुवातीला महायुतीच्या नेत्यांना त्यांना समर्थन दिलं होतं. मात्र सदा सरवणकर यांनी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे इथली निवडणूक तिरंगी होणार आहे. रविवारी राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंच्या सभेत सदा सरवणकरांवर नाव ने घेता जोरदार टीका केली. आता पत्रकार परिषदेत बोलताना सरवणकरांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मला नाही वाटत राज ठाकरेंना माझ्याविषयी काही राग आहे, असेही सरवणकर म्हणाले.

"निवडणुकीदरम्यान प्रतिस्पर्ध्याविरुद्ध बोलणं, त्याच्यावर टीका करणे हे सुरूच असतं. राज ठाकरेंकडे आम्ही आजही आदरपूर्वक बघतो. ते जर असं काही म्हणाले असतील तर मला वाटत नाही की मी त्यावर काही उत्तर द्यावं. शेवटी ही सगळी आंदोलने आहेत. या आंदोलनांमध्ये बाळासाहेबांचे विचार बाजूला ठेवून सहभागी झालो नाही. काँग्रेसमध्ये गेलो तेव्हा काय झालं होतं याचे साक्षीदार तुम्ही आहात. एखादा आमदार दोन वेळा निवडून येतो आणि अचानक कोणी घरगडी आणून उभा केला जातो. त्यावेळी बाळासाहेबांचा शिवसैनिक कधीच स्वस्त बसत नाही. त्यावेळी माझी भूमिका होती की अन्याय होतोय. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जो मार्ग मिळेल त्या मार्गाने मी गेलो," असं सदा सरवणकर यांनी म्हटलं.

काय म्हणाले राज ठाकरे?

"मागे बाळासाहेब हयात असताना ही व्यक्ती काँग्रेसमध्ये गेली. काँग्रेसमधून आमदारकीला उभी राहिली. मग काँग्रेसमधून आमदारकीला पडली, मग पुन्हा शिवसेनेत आली. मग पुन्हा निवडणूक लढवली. मग पुन्हा एकनाथ शिंदेंचं बंड झाल्यावर पेट्रोलपंपावर एकनाथ शिंदेंना शिव्या दिल्या आणि संध्याकाळी एकनाथ शिंदेंबरोबर जाऊन बसले. कोण ही माणसं? व्यक्ती म्हणून ज्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही, हे आपले आहेत की नाही, त्यांच्याबद्दल आपण काय आणि किती बोलणार?," अशी टीका राज ठाकरेंनी केली होती.

Web Title: Mahim Assembly constituency I look at him with respect Sada Saravankar reply to Raj Thackeray criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.