"मी नाही महेश सावंत माघार घेतील"; सदा सरवणकरांचे मोठं विधान; म्हणाले, "नातेसंबंधांमुळे..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 01:03 PM2024-11-01T13:03:04+5:302024-11-01T13:09:31+5:30
मी निवडणूक लढवणार आणि जिंकणार असा विश्वास शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी व्यक्त केला आहे.
Mahim Assembly Constituency: माहीम विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांबाबतचा गोंधळ अद्याप संपलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबी फॉर्म दिल्यानंतर विद्यमान सदा सरवणकर यांनी महायुतीमधील नेत्यांचा विरोध बाजूला सारत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र आता त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच सदा सरवणकर यांनी ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांच्याबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांच्या विजयासाठी महायुतीच्या नेत्यांकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी सदा सरवणकर यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती करण्यात येत आहेत. मात्र सदा सरवणकर हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. ३० वर्षांपासून जनतेचे काम करतोय त्यांच्यासाठी हजर असतो, त्यामुळे मी निवडणूक लढवणार आणि जिंकणार असा विश्वास शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी व्यक्त केला आहे. तसेच ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत हे उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतात असं सरवणकर यांनी म्हटलं आहे.
"महेश सावंत यांचा सल्ला घेण्यासाठी मी या क्षेत्रात नवीन नाही. मला असं वाटतं त्यांना कधी मार्गदर्शनाची गरज लागली तर त्यांनी माझं मार्गदर्शन घ्यावे. तीस वर्ष मी या क्षेत्रात काम करतोय. मतदार संघातले मतदार आणि या विभागातील सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते यांचा प्रचंड दबाव आहे. दिवसाला मला शंभर फोन येत असतील तर त्यातली ८० फोन हे माघार घेऊ नका हे सांगण्यासाठी असतात," असं सदा सरवणकर यांनी म्हटलं.
"मतदारांनी ही निवडणूक एकतर्फी करायची ठरवलं आहे. तुम्हाला कोणी सांगितलं आहे की मी माघार घेणार आहे. महेश सावंत माघार घेणार नाहीत याची जरा काळजी घ्या. कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध मधे येतील आणि तिथून माघार घेतली जाईल. महेश सावंत माघार घेऊ शकतात कारण त्यांचे नातेसंबंध मधे येतील, असेही सदा सरवणकर म्हणाले.