Mahim Assembly Constituency :माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसेकडून अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राज ठाकरे यांचे सुपुत्र पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. त्यांची मुख्य लढत ही विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे महेश सावंत यांच्यासोबत असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वाचें लक्ष लागलेलं आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाने आता अमित ठाकरेंविरोधात तक्रार केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये आचारसंहितेचे अमित ठाकरेंनी उल्लंघन केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. या तक्रारीचे पत्र ठाकरे गटाने मुख्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना पाठवलं आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग यावर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आणि सचिव अनिल देसाई यांनी तक्रारीचे पत्र लिहीलं आहे. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पक्षाच्या बॅनरखाली दीपोत्सव साजरा करायला बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे देण्यात आलेल्या नियमबाह्य परवानगी देण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. या कार्यक्रमस्थळी मनसेचे माहीम विधानसभेचे उमेदवार अमित राज ठाकरे हे उपस्थित राहिल्याने या कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा अशीही मागणी ठाकरे गटाने केली आहे.
काय म्हटलंय पत्रात?
"महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक २०२४ ची घोषणा झाली आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असतानाही बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला छत्रपती शिवाजी महाराज पार्क या महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सार्वजनिक स्थळावर निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करून दीपोत्सव साजरा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच या कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र नवनिर्माण रोना पक्षातर्फे सर्वत्र बॅनर, गेट व कंदील लावण्यात आले आहेत. आदर्श आचारसंहिता काळात सार्वजनिक मालमत्ता विरूप करण्याच्या कलमाखाली हा सरळसरळ नियमभंग आहे," असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
"तसेच या कार्यक्रमाच्या उद्घटनावेळी स्थानिक माहिम विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार अमित राज ठाकरे यांनी उपस्थिती दर्शविल्याप्रमाणे ही आयोगाचे पत्र क्र ५३७/६/ओआर/१५/एनसीएस/११५८, दिनांक २९ मार्च १९९६ तसेच आयोगाचा आदेश क्र.४२७/५/इएस/००२५/१४/एमसीएस, दिनांक २१ ऑक्टोबर, १९९४ (अनुदेशांचे सारसम्म २००४मधील वाव क्र. १३३ प्रमाणे पुनरुधूत केलेले) या नियमानुसार उमेदवाराच्या निवडणूक खर्चात अंतर्भूत करणारी बाब ठरत असल्याने संपूर्ण दीपोत्सवाचा खर्च हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना माहिम विधानसभा उमेदवार अमित राज ठाकरे यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा तसेच आदर्श आचारसंहिता काळात सार्वजनिक जागांवर पक्षाच्या प्रचारात बेकायदेशीर परवानगी देण्याचा महापालिका अधिकारी व इतर संबंधित प्राधिकरणाचे अधिकारी यावर भारत निवडणूक आयोगाने सख्त कारवाईचे निर्देश द्यावेत, अशी मागणी आम्ही या पत्राद्वारे करीत आहोत," असेही या पत्रात म्हटलं आहे.