Join us

माहीम चर्चमध्ये अज्ञात व्यक्तीकडून १८ कबरींची तोडफोड; पोलिसांकडून गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2023 7:12 AM

मुंबई : एका अज्ञात व्यक्तीने शनिवारी पहाटे माहीम येथील सेंट मायकल चर्चमध्ये घुसून १८ कबरींची तोडफोड केल्याने कॅथलिक समुदायात ...

मुंबई : एका अज्ञात व्यक्तीने शनिवारी पहाटे माहीम येथील सेंट मायकल चर्चमध्ये घुसून १८ कबरींची तोडफोड केल्याने कॅथलिक समुदायात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीचा चेहरा चर्चच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्याचा हेतू हा चोरी नसून केवळ तोडफोड करण्याचा होता, असे चर्च प्राधिकरणाचे म्हणणे असून माहीम पोलिसांनीही याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

अलीकडेच म्हणजे २ जानेवारी रोजी पालिकेने वांद्रे पश्चिम येथील रस्ता रुंदीकरणासाठी सेंट पीटर्स समुद्रकिनारी असलेल्या स्मशानभूमीचा एक भाग पाडण्याची नोटीस बजावली. या नोटिशीनंतर कॅथलिकांनी या निर्णयाला विरोध केल्यामुळे पालिकेनेही शुक्रवारी ही नोटीस मागे घेतली आहे. कॅथलिक लोकांनी सांगितले की, काही लोक त्यांच्या समुदायाला आणि चर्चला लक्ष्य करत आहेत आणि धार्मिक भावना दुखावत आहेत.

सेंट मायकल चर्च माहीम पश्चिम येथे स्थित आहे, जे माहीम चर्च म्हणूनही प्रसिद्ध आहे. चर्चच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते दररोज सकाळी ६ वाजता प्रार्थना करतात. आरोपीचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असून तो आधी प्रार्थनेत सहभागी झाला. त्यानंतर तो बाहेर कब्रस्तान परिसरात गेला आणि कबरींची तोडफोड करू लागला.

चर्च, स्मशानभूमींना संरक्षण देण्याची मागणी

आरोपीने सुमारे १८ कबरींचे आणि क्रॉसचे नुकसान केले आणि नंतर तो पळून गेला. त्यामुळे आता मुंबईतील चर्च आणि स्मशानभूमींना संरक्षण देण्याची मागणी कॅथलिकांकडून केली जात आहे. दरम्यान, माहीम पोलिसांनीही अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे. मायकल चर्चचे फादर बर्नार्ड लॅन्सी पिंटो, पॅरिश प्रिस्ट यांनीही तोडफोडीची ही घटना दुःखद आणि धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :पोलिसअटक